सुपरस्टार शाहरुख खानच्या ओम शांती ओम सिनेमात शाहरुखचा एक डायलॉग आहे. “कितनी शिद्दत से मैने तुम्हे पाने की कोशिश की थी, की जर्रे ने मुझे तुमसे मिलने की साजिश की थी”. फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर त्याच्या स्वप्नातील ती ट्रॉफी उंचावत तो हा डायलॉग बोलतो. काहीशी अशीच भावना आयपीएल जिंकणाऱ्या खेळाडूंची असते. ते देखील आयपीएलची सुंदर ट्रॉफी हातात घेत हाच डायलॉग म्हणण्यासाठी उत्सुक असतात.. आयपीएलमधून मिळणारा पैसा एका बाजूला आणि ट्रॉफी उंचावण्याचा तो क्षण एका बाजूला असतो.
मात्र ज्या ट्रॉफीसाठी संघ मालक, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ अक्षरश: जिवाचं रान करतात, ती ट्रॉफी बनते कशी? तिचे कारागीर कोण? तिची किंमत किती? दरवर्षी नवीन ट्रॉफी बनते का? अशा नानाविध प्रश्नांची उत्तरं या लेखातून जाणून घेऊ…
आयपीएलचा पहिला हंगाम खेळला गेला आणि राजस्थान रॉयल्स संघ चॅम्पियन बनला. त्यावेळी एक सुंदर ट्रॉफी त्यांना दिली गेली. ट्रॉफीच्या समोर एका पूर्ण सोन्याच्या बॅटरची प्रतिकृती होती. त्याच्या मागच्या बाजूला जो चौकोनी भाग होता तो देखील पुर्ण सोन्याने व हिर्याने मढवलेला होता. त्या भागावर भारताचा नकाशा आणि सहभागी आठ संघांचे लोगो होते. तत्कालीन आयपीएल चेअरमन ललित मोदी यांच्या संकल्पनेतून ती ट्रॉफी बनवली गेलेली आणि ही ट्रॉफी घडवली होती ऑरा डायमंडच्या डिझायनर मोना मेहता आणि इतर १४ डिझायनर्सने. मात्र, केवळ तीनच वर्ष ही ट्रॉफी दिली गेली.
आयपीएलची ही मुळ ट्रॉफी हटवण्यामागे दोन कारणे होती. एक म्हणजे ती ट्रॉफी डिझाईन करतानाच अशी केली होती की, त्यावर फक्त तीन विजेत्यांची नावे लिहिली जाऊ शकतात. तर दुसरे कारण म्हणजे, ललित मोदी यांना बीसीसीआयमधून सस्पेंड केल्यानंतर, त्यांच्या संबंधित काही गोष्टी बीसीसीआयला नको होत्या. त्यामुळे आयपीएलची ती ट्रॉफी २०१० नंतर दिसलीच नाही.
२०११ मध्ये ज्यावेळी नव्या आयपीएल ट्रॉफीचे डिझाईन बनवण्याचा विचार सुरू झाला, तेव्हा पुन्हा एकदा मोना मेहता यांच्यावरच विश्वास दाखवला गेला. त्यांनी देखील आपल्या कौशल्याचा पूर्ण वापर करत, ३० कारागिरांच्या मदतीने सोन्याची ती झळाळती ट्रॉफी बनवली. ही ट्रॉफी इटालियन मेटल मेकिंग पद्धतीने बनवली गेली आहे. आयपीएलच्या या ट्रॉफीची किंमत किती आहे? या प्रश्नाचे उत्तर बीसीसीआयने कधीही दिले नाही. मात्र, काही बीसीसीआय ऑफिशियल्सच्या मते ही ट्रॉफी ५ कोटींची आहे.
आयपीएलची ही ट्रॉफी तुम्ही बारकाईने पाहता तेव्हा, तुम्हाला एक गोष्ट आढळून येते की, त्यावर काही अक्षरे लिहिली आहे. संस्कृतमधील ती अक्षरे आहेत ‘यात्रा प्रतिभा अवसरा प्रपनोतिही’. म्हणजेच येथे प्रतिभेला संधी जाते. टॅलेंट मीट अपॉर्च्युनिटी, आयपीएलचे हे घोषवाक्य पंधरा वर्षात नेहमीच खरे झाले आहे.
परंतु ज्या ट्रॉफीसाठी हा सारा अट्टहास चाललेला असतो, ती ओरिजनल ट्रॉफी टीमला मिळतच नाही. आयपीएलची जी ओरिजनल ट्रॉफी आहे ती केवळ, जिंकल्यानंतर ग्राऊंडवरील सेलिब्रेशन पुरतीच त्या संघाकडे दिली जाते. त्यानंतर हॉटेलमधील आणि बाहेरच्या इतर सेलिब्रेशनसाठी खेळाडूंच्या हातात दिसते, ती असते ट्रॉफीची रिप्लिका. आयपीएलची खरी ट्रॉफी कधीच टीमच्या कॅबिनेटपर्यंत जात नाही. फक्त समाधान एवढ्याच गोष्टीचे की, जिंकणाऱ्या टीमच्या नावाची मेटल्स स्ट्रिप ओरिजनल ट्रॉफीवर लागते. आयपीएलची ओरिजनल ट्रॉफी बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये सेफ आणि सुरक्षित असते.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL फायनलसाठी उगाचच नव्हते निवडले नरेंद्र मोदी स्टेडियम, सोयी-सुविधांनी आहे परिपूर्ण
IPL 2022मध्ये सापडलं भारताचं भविष्य; ‘ही’ आहे टीम इंडियाची सर्वोत्तम अनकॅप्ड प्लेइंग इलेव्हन
‘मुंबई संघात निवड होणे वेगळे आणि…’, अर्जुनला एकही सामना न खेळण्याबाबत प्रशिक्षकाचे मोठे भाष्य