मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर भारताचा 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा मार्ग अधिक कठीण झाला आहे. चला तर मग, या बातमीद्वारे जाणून घेऊया की मेलबर्न टेस्ट हरल्यानंतर आता टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कशी पोहोचू शकते?
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आधीच धडक मारली आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात चुरस आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.
मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर आता WTC फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये खेळली जाणारी कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागेल. टीम इंडिया सिडनीमध्ये WTC 2023-25 सायकलचा शेवटचा सामना खेळणार आहे, ज्यामध्ये जिंकणं भारतासाठी अनिवार्य असेल. जर टीम इंडिया सिडनी कसोटी हरली किंवा सामना अनिर्णित राहिला तर त्यांच्या WTC फायनलमध्ये जाण्याच्या आशा पूर्णपणे संपुष्टात येतील.
टीम इंडियानं सिडनी कसोटी जिंकल्यास संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. परंतु हे तेव्हाच होईल, जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरुद्धची मालिका 1-0 किंवा 2-0 ने जिंकू शकला नाही. भारताविरुद्ध सिडनी कसोटी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियानं पुढील मालिकेत श्रीलंकेविरुद्ध 2-0 असा विजय नोंदवला तर टीम इंडिया अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
दक्षिण आफ्रिकेनं प्रथमच WTC फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मागील आवृत्तीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता, ज्यात ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला होता. तर WTC च्या पहिल्या आवृत्तीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता, ज्यात न्यूझीलंडना टीम इंडियाचा पराभव केला होता.
हेही वाचा –
मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव, मालिकेत ऑस्ट्रेलियाची आघाडी
स्निकोमीटरमध्ये कोणतीही हालचाल नाही, तरीही यशस्वी जयस्वाल आऊट कसा? अंपायरच्या निर्णयामुळे मोठा वाद
भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीत घडला नवा इतिहास, 88 वर्ष जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त!