टी20 विश्वचषकापूर्वी सर्वत्र चर्चा होती की, आयपीएलमध्ये आरसीबीसाठी सलामी करताना दमदार कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला टी20 विश्वचषकातही हीच भूमिका मिळणार आहे. झालंही तसंच. विश्वचषकाच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये विराट कोहली रोहित शर्मासोबत सलामीला आला. मात्र या तीनही सामन्यांमध्ये तो दुहेरी आकडाही गाठू शकला नाही.
बुधवारी, (12 जून) अमेरिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे आता त्याला पुन्हा नंबर 3 वर पाठवण्याची मागणी चाहते करत आहेत. मात्र जर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर गेला, तर रोहित सोबत सलामीला कोण येणार? सलामीसाठी यशस्वी जयस्वालला प्लेइंग 11 मध्ये घेतलं, तर दुसऱ्या एका फलंदाजाला बाहेर बसावं लागेल. या समस्येवर आता टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ यानं तोडगा सुचवला आहे. त्यानं यशस्वी जैस्वालला प्लेइंग इलेव्हनमध्ये न घेता विराट कोहलीला नंबर-3 वर फलंदाजीसाठी कसं पाठवता येईल, हे सांगितलंय.
अमेरिकेविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “नंबर-3 वर फलंदाजीला येण्याचा फायदा असा आहे की, तुम्ही बाहेर बसून खेळाचं विश्लेषण करू शकता. गोलंदाज काय करण्याचा प्रयत्न करत आहे? खेळपट्टी कशी आहे? याचा अंदाज तुम्ही लावू शकता. विराट कोहली या गोष्टी करण्यात पटाईत आहे. तो बाहेर बसून हे विश्लेषण करण्यात मास्टर आहे.”
मोहम्मद कैफ पुढे बोलताना म्हणाला, “मला वाटतं की विराट कोहलीनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं. तर रिषभ पंतनं त्याच्या जागी सलामीला यावं. जर तो (रिषभ) पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो, तर तो सलामीला देखील येऊ शकतो. तसेच यामुळे डावं-उजवं समीकरण देखील साधता येईल.”
आता आगामी सामन्यांमध्ये टीम इंडिया प्लेइंग 11 मध्ये असे बदल करेल का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. भारतीय संघाचा शेवटचा साखळी सामना 15 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीचा ‘स्टॉप क्लॉक’ नियम काय आहे? ज्यामुळे भारताला 5 धावा फुकट मिळाल्या, जाणून घ्या
भारताच्या विजयाचा पाकिस्तानला फायदा! सुपर-8 चं समीकरण बनलं आणखी रोमांचक
मोक्याच्या क्षणी सूर्या आला फॉर्ममध्ये! सर्व टीकाकारांची बोलती बंद