पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आज आपला ४५वा वाढदिवस साजरा करत आहे. १३ ऑगस्ट १९७५ रोजी जन्म झालेल्या शोएब अख्तरची ही खास गोष्ट आज त्याच्या वाढदिवसानिमित्त
पाकिस्तान क्रिकेट संघाने इम्रान खान, वसिम अक्रम, वकार युनिस, आकिब जावेद सारखे दिग्गज गोलंदाज जागतिक क्रिकेटला दिले. यासोबतच आणखी एक असा क्रिकेटपटू होता ज्याची संपूर्ण कारकीर्द खूप चर्चेत राहिली तो खेळाडू म्हणजे ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ या नावाने ओळखला जाणारा शोएब अख्तर.
लांबलचक धाव घेत फलंदाजाच्या दिशेने धावत येणारा जबरदस्त गोलंदाज शोएब अख्तर आपल्या वेगाने फलंदाजांच्या पोटात गोळा आणायचा. तब्बल 161 किमी वेगाने गोलंदाजी करत विरोधी संघातल्या फलंदाजाचे धाबे दणाणून सोडत होता. त्याच्या स्वभावाप्रमाणे गोलंदाजीतही तो आक्रमक होता.
बाऊन्सर पुढे ब्रायन लारा ही जमिनीवर कोसळला
सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून त्याने पाकिस्तानच्या संघात 13 वर्षाहून अधिक काळ व्यतीत केला. आपल्या बाऊंसर चेंडूने अनेकांना धडकी भरवली. अगदी ब्रायन लारा सारखा दिग्गज फलंदाज त्याचा बाऊन्सर खेळताना जमिनीवर पडला होता.
संघर्षमय जीवनप्रवास
शोएब अख्तरचा संपूर्ण प्रवास हा संघर्षमय आहे. अनेक वर्षे त्याने गरिबीत काढले. त्याचे वडील एका कंपनीमध्ये पहारेकरी म्हणून काम करायचे. गरिबीत राहूनही त्याने मोठे स्वप्न पाहिले होते. मात्र, आई वडील त्याला कधीच पैसे देत नव्हते आणि शहर सोडून कुठेही जाऊ देत नव्हते.
क्रिकेटच्या मोहापायी सोडले घर
क्रिकेटची आवड असलेल्या शोएबला स्वस्त बसू देत नव्हते. अखेर त्याने आपल्या परिवाराला न सांगताच पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स संघाच्या ट्रायलसाठी लाहोरला गेला. लाहोरला जाण्यासाठी शोएब अख्तरच्या खिशात दमडी देखील नव्हती. शोएबने काही अंतर बसच्या छतावर बसून काढले. मात्र, पैसे नसल्याने कंडक्टरने त्याला मध्येच उतरवले.
टांगे वाल्यांमुळे बदलले आयुष्य
निराश भावनेने रस्त्यात थांबलेल्या शोएबला अचानक एक टांगेवाला दिसला. शोएबने त्याला लाहोरपर्यंत सोडण्याची विनंती केली. टांगेवाल्याने शोएबवर दया दाखवत त्याला लाहोरच्या स्टेडियमपर्यंत सोडण्याची तयारी दर्शवली. वाटेत त्याने शोएबला जेवणही दिले. दोघांनी मिळून एक रात्र रस्त्यावर काढली. दुसऱ्या दिवशी शोएब आणि टांगेवाला लाहोरमध्ये पोहोचले. हीच घटना शोएबच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट ठरली.
झहीर अब्बास यांनी हेरले
ट्रायलसाठी अख्तर जेव्हा मैदानावर गेला तेव्हा मैदानात 5 हजार मुले होते. ट्रायल सुरू झाले आणि शोएब अख्तरने वेगात चार ते पाच राऊंड धावत पूर्ण केले. पाकिस्तानचे माजी दिग्गज फलंदाज जहीर अब्बास यांनी शोएबला हेरले. शोएबला विचारणा केली की तो कोण आहे? शोएबने वेगवान गोलंदाज असल्याचे झहीर अब्बास यांना सांगितले. झहीर अब्बास यांनी त्याला गोलंदाजी करण्यास सांगितले.
चेंडू फेकताच उडाला थरकाप
मैदानात शोएब अख्तरने लांबलचक धाव घेतानाचे पाहून सारे जण अचंबित झाले. त्याने पहिलाच चेंडू बाऊंसर टाकला तर दुसरा चेंडू थेट फलंदाजाच्या बरगड्यांवर फेकला. शोएबची गोलंदाजी पाहून झहीर अब्बाससह मैदानातील ट्रायल देण्यासाठी आलेले खेळाडू आश्चर्यचकीत झाले.
पाच हजार खेळाडूंमध्ये झाली निवड
ट्रायलसाठी आलेल्या पाच हजार खेळाडूंना त्याने मागे टाकले. त्याची पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स संघात निवड झाली. दर महिन्याला पाचशे रुपये मानधन मिळू लागले. त्यानंतर त्याने कधीच पाठीमागे वळून पाहिले नाही. आपल्या गोलंदाजीने जगभर चाहते निर्माण केले. एक दशकाहून अधिक काळ त्याने आपल्या गोलंदाजीचा दबदबा जागतिक क्रिकेटमध्ये कायम ठेवला.
संधी न मिळाल्याचे दुःख
बेशिस्त वर्तन, फॉर्म आणि फिटनेसचे शुक्लकाष्ट यामुळे तो संघात आत बाहेर होत राहिला. 2011 च्या विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात खेळवण्यात आले नसल्याचे दुःख आजही शोएब अख्तरला आहे. अखेर निराश शोएबने 2011 साली झालेल्या वनडे विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. आपल्या कारकिर्दीत तो पाकिस्तानकडून खेळताना 46 कसोटी सामन्यात 178 बळी टिपले. 163 वनडे सामन्यात 247 बळीची नोंद त्याच्या नावावर आहे.