इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) 13 व्या मोसमाला येत्या 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यापुर्वी ऑस्ट्र्रेलिया संघाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) एक आनंदाची बातमी आहे. वॉर्नरला आयपीएलच्या सनरायझर्स हैद्राबाद संघाचे कर्णधार करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, वॉर्नर पुन्हा एकदा अशा संघाचा कर्णधार बनला आहे ज्या संघाने 2 वर्षांपुर्वी त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली नव्हती.
झाले असे की, आयपीएल 2018मध्ये सनराइझर्स हैद्राबाद संघाने वॉर्नरवर बंदी घातली होती. कारण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणामुळे त्याचवर्षी वॉर्नरला 1 वर्षासाठी निलंबीत केले होते. तरीही आयपीएल 2019मध्ये वॉर्नर हैद्राबाद संघासाठी खेळला होता. तसेच, तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला होता.
वॉर्नरने हैद्राबाद संघाचे कर्णधारपद यापुर्वीही सांभाळले आहे आणि संघाला विजयही मिळवून दिला आहे. 2016 साली वॉर्नर हैद्राबाद संघाचा कर्णधार होता. त्यावेळी त्याने संघाला विजेतेपदही मिळवून दिले होते. मात्र, 2018च्या अंतिम सामन्यात हैद्राबाद संघाला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता.
सनराइझर्स हैद्राबाद संघाने 2013 साली आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी संघाचा कर्णधार श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा (Kumar Sangakkara) होता.
चेंडू छेडछाड प्रकरणामुळे वॉर्नरने हैद्राबाद संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 2018 आणि 2019च्या मोसमात न्यूझीलंडचा फलंदाज केन विलियम्सन (Kane Williamson) हा संघाचा कर्णधार होता. गतवर्षी वॉर्नर हैद्राबाद संघाकडून खेळला असला तरी, बंदीमुळे त्याला संघाचा कर्णधार होण्याची संधी मिळाली नव्हती.