मुंबई । लढाऊ वृत्तीचा आणि ‘बंगाली टायगर’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी कर्णधार मानला जातो. 2000 साली क्रिकेट जगतात मॅच फिक्सिंगने वातावरण गडूळ बनले होते. अशा कठीण प्रसंगी संघाची कमान सांभाळत भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ऑस्ट्रेलियाच्या आरेला कारे म्हणत दमदार कामगिरी करून त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.
2003 साली त्याच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि झहीर खान यांसारखे धुरंधर खेळाडू हे दादांच्या तालमीत घडले. त्यांच्या यशा पाठीमागे सौरव गांगुलीचा मोठा हात आहे, हे विसरून चालणार नाही. नेतृत्त्वासोबतच एक दशकापेक्षा जास्त काळ दादांच्या फलंदाजीची दादागिरी सुरू होती. निवृत्तीनंतर दादा समालोचकांच्या भूमिकेत दिसला.
आज तो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. आपल्या कारकिर्दीत सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर ही सलामीची जोडगोळी क्रिकेटमध्ये प्रसिद्ध होती. धडाकेबाज खेळी करत प्रतिस्पर्धा संघावर दडपण आणणाऱ्या या सलामीवीर जोडीने अनेक विक्रम केले. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या सौरव गांगुलीची कारकीर्द मदन लाल यांच्या एका सल्ल्यामुळे बदलली असल्याचा दावा खुद्द मदनलाल यांनी केला आहे.
त्यावेळचे प्रशिक्षक असलेले भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक मदन लाल यांनी गांगुली याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याऐवजी सलामीला खेळण्याचा सल्ला दिला होता. फेसबुक लाइव्हद्वारे चाहत्यांशी सवांद साधताना ते म्हणाले, ” मी दिलेला सल्ला सौरव गांगुलीला आठवतो की नाही हे मला माहित नाही. त्याच्यात असलेल्या क्षमतेचा भारतीय संघाला उपयोग व्हावा, असे मला वाटायचे म्हणून मी त्याला सलामीला खेळण्याचा सल्ला दिला होता.”
“प्रत्येक खेळाडूची फलंदाजीची शैली वेगळी होती. सौरव गांगुलीकडे अनेक राजस फटके होते. त्याचा तो सुवर्णकाळ होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या सामन्यानंतर सौरव गांगुलीने पाठीमागे वळून कधीच पाहिले नाही. सचिन आणि सौरवची सलामीची जोडी पुढे लोकप्रिय झाली. मला आजही आठवते की श्रीलंका दौऱ्याच्या वेळी मी त्याला हा सल्ला दिला होता.”
“सौरव गांगुली सुरुवातीच्या काही सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. त्यानंतर झलक काही खास योगदान देताना नाही.”
1996 साली जयपूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात गांगुलीला सलामीची जबाबदारी मी दिली होती. त्यावेळी मी संघाचा प्रशिक्षक होतो. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या खतरनाक गोलंदाजांचा सामना करत धडाकेबाज 54 धावाची अर्धशतकी खेळी साकारली. त्या सामन्यातील बहारदार प्रदर्शनामुळे सचिन आणि सौरव ही जोडी सलामीला नियमित खेळताना दिसून आली.” असेही ते पुढे म्हणाले.