---Advertisement---

शुबमन गिलने सगळ्यांना टाकले मागे, वनडे क्रिकेटमध्ये रचला ‘हा’ बलाढ्य विक्रम

On: सोमवार, ऑगस्ट 22, 2022 8:38 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या (ZIMvsIND)दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने मोठी धावसंख्या उभारली आहेत. यावेळी उजव्या हाताचा युवा फलंदाज शुबमन गिल हा भलताच लयीत दिसत आहे. त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करत मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता. आता तो झिम्बाब्वे दौऱ्यातही हा पुरस्कार जिंकण्यापासून काही क्षणच दूर आहे. त्याने सोमवारी (२२ ऑगस्ट) तिसऱ्या वनडेत कारकिर्दीतील पहिले शतक केले आहे. याबरोबरच त्याने एका मोठ्या आणि महत्वाच्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

शुबमन गिल (Shubman Gill) याने भारताकडून खेळताना नवव्या डावात आंतरराष्ट्रीय स्तरावरील वनडे शतक केले आहे. याबरोबरच तो वनडेच्या ९ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. हा विक्रम करताच त्याने श्रेयस अय्यर याला मागे टाकले आहे. गिलने वनडेमध्ये पदार्पण केल्यापासून ९ डावांमध्ये ७१.२९च्या सरासरीने ४९९ धावा केल्या आहेत. आधी हा विक्रम श्रेयसच्या नावावर होता, त्याने वनडेच्या पहिल्या ९ डावांमध्ये ४६९ धावा केल्या होत्या. श्रेयसने नवजोत सिंग सिद्धू (४१७) आणि शिखर धवन (४०१) यांचा विक्रम मोडला होता.

गिलने शतक करताच तो भारताकडून विदेशात सर्वात कमी वयाचा तिसराच खेळाडू ठरला आहे. त्याने वय २२ वर्ष ३४८ दिवसांमध्येच झिम्बाब्वे विरुद्ध शतकी खेळी केली आहे. त्याच्यापेक्षा कमी वयात अशी कामगिरी विराट कोहली (२२ वर्ष ३१५ दिवस) आणि युवराज सिंग (२२ वर्ष ४१ दिवस) यांनी केली आहे. तर भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने वय २३ वर्ष २८ दिवस असताना वनडेमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध शतक केले होते.

आंतरराष्ट्रीय वनडेच्या पहिल्या ९ डावात सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
४९९ शुबमन गिल
४६९ श्रेयस अय्यर
४१७ नवजोत सिंग सिद्धू
४०१ शिखर धवन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---