गोवा: हैदराबाद एफसीने ०-१ अशा पिछाडीनंतर जबरदस्त पुनरागमन करताना इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) दुसऱ्या सेमीफायनलच्या पहिल्या लेग सामन्यात एटीके मोहन बागानवर दणदणीत विजय मिळवला. १८व्या मिनिटाला पिछाडीवर पडूनही हैदराबादचा आजचा खेळ अव्वल दर्जाचा राहिला. बार्थोलोमेव ऑग्बेचे (४५+३ मि.), यासिर मोहम्मद (५८ मि.) व झेव्हियर सिव्हेरियो (६४ मि.) यांच्या गोलने हैदराबादला ३-१ असा विजय मिळवून दिला.
मोहन बागानने अखेरच्या काही मिनिटांत आक्रमणाची धार तीव्र केली, परंतु हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी त्यांना यश मिळवू देत नव्हता. ९० ते ९२ या दोन मिनिटांत मोहन बागानला पाच कॉर्नर मिळाले, परंतु त्यावर त्यांना गोल काही करता आला नाही. आजचा गोल हा आयएसएल २०२१-२२ पर्वातील ऑग्बेचेचा १८ वा गोल ठरला आणि त्याने आयएसएलच्या एकाच पर्वात सर्वाधिक गोल करणाऱ्या फेरान कोरोमिनास ( २०१७-१८) याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
मोहन बागान व जमशेदपूर यांच्यात आक्रमणाचा बहारदार खेळ होणार हे अपेक्षित होते अन् पहिल्या १०-१५ मिनिटांत मोहन बागानने दबदबा गाजवला. लिस्टन कोलासो दोनवेळा चेंडू पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेला होता. जमशेदपूरच्या खेळाडूंनी बचाव चांगला केला अन्यथा मोहन बागानची आघाडी निश्चित होती. १८व्या मिनिटाला मात्र मोहन बागानला बचावभींत भेदण्यात यश आले. कोलासो पुन्हा चेंडू पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेला आणि त्यानं केलेल्या योग्य वेळी योग्य पासवर रॉय कृष्णाने कोणतीच चूक न करता गोल केला. ४५ मिनिटांच्या खेळात मोहन बागानने हैदराबादच्या आक्रमणाला चखडून ठेवले होते. त्यांना एकही ऑन टार्गेट प्रयत्न करू दिला नव्हता. पण, ४५+३ मिनिटाला मोहन बागानचे बचावपटू आपल्याच पेनल्टी क्षेत्रात चेंडू सोबत खेळत राहिले आणि त्यांच्यातला समन्वय तुटला. त्याचा फायदा उचलत ऑग्बेचेने हेडर द्वारे सुरेख गोल केला.
दुसऱ्या हाफमध्ये हैदराबादचे वर्चस्व पाहायला मिळाले. ५८व्या मिनिटाला ऑग्बेचेच्या कौशल्यासमोर मोहन बागानचे बचावपटू फिके ठरले. यासिर मोहम्मदने सुरेख गोल करताना हैदराबादला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यात ६४ व्या मिनिटाला आणखी एकाची भर पडली. अनिकेत जाधव चेंडू पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेला, परंतु मोहन बागानच्या बचावपटूने त्याला रोखले. मात्र, हैदराबादला कॉर्नर मिळाला आणि यासिरकडून आलेल्या क्रॉसवर झेव्हियर सिव्हेरियोने हेडरद्वारे गोल करून हैदराबादला ३-१ अशा मजबूत स्थितीत आणले.
पुढे ७२व्या मिनिटाला मोहन बागानच्या लिस्टन कोलासोचा प्रयत्न अडवला गेला. पण, मोहन बागानकडून आता सातत्याने प्रयत्न होताना दिसले. ह्युगो बौमोस व जॉनी काउको यांचा खेळ सुरेख झाला, परंतु चेंडूला अंतिम दिशा देण्यात ते अपयशी ठरले. ८२व्या मिनिटाला मोहन बागान पुन्हा गोल करण्याच्या अगदी नजीक आले होते, परंतु मनवीर सिंग अंतिम टच देऊ शकला नाही. अखेरच्या काही मिनिटांत मोहन बागानचा खेळ उंचावला खरा, परंतु त्यांना गोल करण्यात यश आले नाही. लक्ष्मीकांत कट्टीमणी त्यांच्यासमोर अभेद्य भिंत उभी करून होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आयएसएल: शील्ड विजेत्या जमशेदपूरला केरलाने रोखले; समदचा एकमेव गोल निर्णायक
हैदराबाद एफसी-एटीके मोहन बागान यांच्यात आज ‘रॉयल’ युद्ध!
केरलाविरुद्ध शील्ड विजेते जमशेदपूर ‘हॉट फेवरिट’ आयएसएल सेमीफायनल १ फर्स्ट लेग