गोवा (२८ डिसेबर) : हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील पहिल्या लेगच्या शेवटच्या टप्प्यात ओदिशा एफसीवर ६-१ असा मोठा विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. नायजेरियन फॉरवर्ड बार्थोलोमेव ऑग्बेचेने दोन गोल करताना विजयात मोलाचे योगदान दिले.
बाम्बोलिम येथील ऍथलेटिक्स स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात मंगळवारी सात गोलची नोंद झाली. त्यात हैदराबादचे सहा गोल आहे. पूर्वार्धात २-१ अशी आघाडी घेतलेल्या या क्लबने उत्तरार्धात आणखी चार गोलांची भर घातली. त्यात ऑग्बेचेसह इडु गॅर्सिया, जॅवियर सिव्हेरिओ आणि जाओ व्हिक्टरचे (प्रत्येकी एक गोल) मोलाचे योगदान राहिले. पहिल्या सत्राच्या तुलनेत ओदिशाच्या ढिसाळ बचावाचा फायदा प्रतिस्पर्धी संघाने उठवला.
पहिल्या सत्रात हैदराबादने २-१ अशी आघाडी घेतली. यात दोन स्वयंगोलचा समावेश आहे. जाओ व्हिक्टरच्या पासवर बार्थोलोमेव ऑग्बेचे याने हैदराबादचे खाते उघडले. मात्र, हेक्टर रेमिरेझला लागून चेंडू गोल जाळ्यात गेल्याने रेफ्रींनी हा गोल स्वयंगोल असल्याचे उशीरा जाहीर केले. त्यांचा आघाडीचा आनंद ७ मिनिटे टिकला. हैदराबादच्या हुआनॅनने स्वयंगोल केल्याने १६व्या मिनिटाला १-१ अशी बरोबरी झाली. जॅवियर हर्नांडेझचा डाव्या पायाने मारलेला मजबूत फटका हुआनॅनच्या छातीला लागून गोलपोस्टमध्ये गेला. २३ मिनिटे बरोबरी राहिली. मात्र, बार्थोलोमेव ऑग्बेचे पुन्हा एकदा क्लबच्या मदतीला धावला. पूर्वार्धाला सहा मिनिटे शिल्लक असताना त्याने हैदराबादला आघाडीवर नेले. इडु गॅर्सियाने कॉर्नर किकवरून उंचावरून मारलेल्या फटक्याला ऑग्बेचेने अचूक गोलजाळ्यात ढककले.
ओदिशावरील विजयासह हैदराबादची सलग दोन ‘ड्रॉ’ची मालिका खंडित झाली. ८ सामन्यांतून ४ विजयांसह १५ गुणांनिशी त्यांनी जमशेदपूर एफसी आणि केरळा ब्लास्टर्सला मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले. अव्वल स्थानी असलेला गतविजेता मुंबई सिटी एफसी (८ सामन्यांत ५ विजयांसह १६ गुण) आणि हैदराबादमध्ये आता केवळ एका गुणाचा फरक आहे.
हैदराबादविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर ओदिशाची ‘विनलेस’ सामन्यांची संख्या चारवर गेली. एफसी गोवाविरुद्धच्या बरोबरीपूर्वी, त्यांना जमशेदपूर एफसी आणि चेन्नईयन एफसीविरुद्ध पराभव पाहावा लागला. सद्यस्थितीत सातव्या स्थानी असलेल्या ओदिशाचे ८ सामन्यांतून १० गुण झालेत.उभय संघांमधील आजवरच्या सामन्यांचा निकाल पाहता चार सामन्यांत हैदराबादला ओदिशाविरुद्ध एकदाच जिंकता आले होते. मात्र, मंगळवारी सर्व आघाड्यांवर अप्रतिम खेळ करताना हैदराबादने एका सर्वोत्तम विजयाची नोंद केली.
निकाल : हैदराबाद एफसी ६(हेक्टर रॅमिरेझ-नवव्या मिनिटाला-स्वयंगोल, बार्थोलोमेव ऑग्बेचे-३९व्या, ६०व्या मिनिटाला, इडु गॅर्सिया-५४व्या मिनिटाला, जॅवियर सिव्हेरिओ-७२व्या मिनिटाला, जाओ व्हिक्टर-८६व्या मिनिटाला-पेनल्टी) विजयी वि. ओदिशा एफसी १(हुआनॅन-१६व्या मिनिटाला-स्वयंगोल).