गोवा (दिनांक १६ मार्च) – इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) दुसऱ्या सेमी फायनलची दुसरी लेग कमालीची उत्कंठावर्धक झाली. १-३ अशा पिछाडीवरून मुसंडी मारण्यासाठी एटीके मोहन बागानने सर्वस्व पणाला लावले होते. सुरुवातीपासूनच त्यांनी हैदराबाद एफसीवर ‘हल्ला बोल’ केला. पण, हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणीने त्यांच्यासमोर अभेद्य भिंत उभी केली होती. त्यामुळेच १३ कॉर्नर, ८ ऑन टार्गेट व ८ ऑफ टार्गेट प्रयत्न करूनही मोहन बागानला फक्त १ गोल करता आला. मोहन बागानने ही लढत १-० अशी जिंकली तरी हैदराबादने ३-२ अशा गोलसरासरीच्या जोरावर प्रथमच आयएसएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला.
मोहन बागानने आज चार बदल केले. हैदराबाद एफसीच्या पेनल्टी क्षेत्रात सातत्याने आक्रमण करण्याची रणनीती त्यांनी आखली होती. ७व्या मिनिटाला प्रबिर दास चेंडू घेऊन पेनल्टी बॉक्समध्ये शिरला होता, परंतु हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी सज्ज होता. १९व्या मिनिटाला प्रबिर दास पुन्हा चेंडू सुरेखरित्या घेऊन गेला, परंतु चेंडूला अंतिम दिशा देण्यात यावेळेस त्याने संथपणा दाखवला. कट्टीमणीला चेंडू अडवण्यासाठी फार काही करावा लागले नाही. २२व्या मिनिटाला लिस्टन कोलासोने चेंडू कर्व्ह करून गोलजाळीत पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चेंडू गोलपोस्टच्या बाजूने बाहेर गेला.
२३व्या मिनिटाला हैदराबादच्या बार्थोलोमेव ऑग्बेचेने थेट प्रयत्न केला, पण तो मोहन बागानच्या गोलरक्षक अमरिंदर सिंगने तेवढ्याच चपळाईने अडवला. ३१व्या मिनिटाला कोलासो ६ यार्ड बॉक्समध्ये चेंडू घेऊन गेला होता आणि त्याला गोलरक्षकालाच चकवायचे होते. पण, कट्टीमणीने त्याला पुन्हा यश मिळवू दिले नाही. ३८व्या मिनिटाला प्रबिर दासने ६ यार्ड बॉक्समध्ये मिळालेली सोपी संधी गमावली. पहिल्या हाफमध्ये मोहन बागानचा दबदबा राहिला, परंतु गोल करण्यात अपयश आल्याने त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले.
दुसऱ्या हाफमध्येही मोहन बागानचे आक्रमण सुरूच राहिले. ५०व्या मिनिटाला प्रबिरच्या पासवर आलेला चेंडू रॉय कृष्णाला ६ यार्ड बॉक्सवरून गोलजाळीत पाठवायचा होता. पण, कट्टीमणी अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला अन् मोहन बागानचा गोल अडवला. ५४व्या मिनिटाला सौविक चक्रवर्तीला दुखापतीमुळे माघारी जावे लागले आणि हैदराबादने साहिल तवोराला मैदानावर उतरवले. ५८व्या मिनिटाला सामन्याचे वातावरण तापले. हैदराबादच्या आकाश मिश्राने पेनल्टी बॉक्सबाहेर जोनी काऊकोला पाडले. मोहन बागानच्या खेळाडूंनी पेनल्टीची मागमी केली, परंतु रेफरीने फ्री किक दिली. यावेळी मोहन बागानचा गोलरक्षक अमरिंदर सिंग रेफरीशी हुज्जत घालायला आला आणि त्याला पिवळे कार्ड दाखवले गेले. मोहन बागानलान फ्री किकवर गोल करता आला नाही.
मोहन बागानचे खेळाडू जीव ओतून खेळत होते. चेंडू सर्वाधिक काळ हा हैदराबादच्या क्षेत्रातच होता. ७० मिनिटापर्यंत मोहन बागानने गोल करण्याचे २१ प्रयत्न केले आणि त्यापैकी ५ शॉट ऑन टार्गेट होते. ७९व्या मिनिटाला मोहन बागानच्या खेळाडूंना हैदराबादचा बचाव भेदण्यात यश आले. डाव्या बाजूने कोलासोने दिलेल्या सुरेख पासवर रॉय कृष्णाने अप्रतिम गोल केला. मोहन बागानने १-० अशी आघाडी घेतली. मोहन बागानचे खेळाडू थकलेले जाणवत होते. ९०+१ मिनिटाला मोहन बागानला गोलपोस्टच्या दोन पावलावरून गोल करता आला नाही. ७ मिनिटांच्या भरपाई वेळेत मोहन बागानला आणखी एक गोल करता आला नाही आणि हैदराबाद एफकीने ३-२ असा गोल सरासरीच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला.
निकाल- एटीके मोहन बागान १ ( रॉय कृष्णा ७९ मि. ) विजयी विरूद्ध हैदराबाद एफसी ० ( ३-२ अशा गोल सरासरीच्या जोरावर हैदराबाद फायनलमध्ये )