कोलकाता, २६ नोव्हेंबर : गतविजेत्या हैदराबाद एफसीने हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ (ISL) मध्ये अव्वल स्थान पटकावण्याची संधी पुन्हा गमावली. एटीके मोहन बागान एफसीने घरच्या मैदानावर सुरेख खेळ करताना ३ गुण आपल्या खात्यात जमा केले. ह्युगो बौमोसने ११ व्या मिनिटाला केलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. मोहन बागानने आक्रमणासोबतच बचावातही उल्लेखनीय कामगिरी करताना अखेरपर्यंत हैदराबाद एफसीवर दडपण निर्माण करण्यात यश मिळवले. हैदराबाद अधूनमधून डोकं वर काढण्याचा प्रयत्न करताना दिसले, परंतु त्यांच्या वाट्याला आज यश नव्हते. त्यांचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
यजमान मोहन बागानने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि पहिल्या १० मिनिटांत त्यांनी १ ऑन टार्गेटसह हैदराबादवर सातत्याने दडपण निर्माण करणे सुरू ठेवले होते. ११व्या मिनिटाला मोहन बागानला अखेर १-० आघाडी घेण्यात यश मिळवले. ह्युगो बौमोसने संयमाने खेळ करताना हैदराबादच्या ४ बचावपटूंना चकवले. मोक्याच्या क्षणी तो चेंडू त्याने आशिक कुरुनियनकडे पाठवला अन् हैदराबादच्या गोलरक्षकासह बचावपटू त्याच्याकडे वळलेले दिसताच त्याने पुन्हा चेंडू ह्युगोकडे पाठवला. ह्युगोला गोल करण्यात मग काहीच संघर्ष करावा लागला नाही. पुढच्याच मिनिटाला आशिकने लिस्टन कोलासोला गोल करण्याची संधी निर्माण करून दिली होती, परंतु यावेळेस हैदराबादचे बचावपटू सज्ज होते.
पहिल्या हाफमध्ये मोहन बागानचा खेळ वरचढ झालेला पाहायला मिळाला आणि हैदराबादचे खेळाडू गोंधळले होते. मोहन बागानला एक धक्का बसला आणि मनवीर सिंगला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. मोहन बागानने घरच्या मैदानावर पहिल्या ४५ मिनिटांच्या खेळात वर्चस्व गाजवले आणि १-० अशी आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या हाफमध्ये मोहन बागानच्या खेळात सातत्य राहिले आणि ५०व्या मिनिटाला लिस्टन कोलासोने मारलेला ऑन टार्गेट प्रयत्न हैदराबादचा गोलरक्षक गुरमीत सिंगने रोखला. लिस्टन कोलासो पुन्हा एकदा चेंडू घेऊन पेनल्टी क्षेत्रात शिरला होता, परंतु तो स्वतःच चेंडूवर अधिक काळ खेळत राहिला आणि मोहन बागानला दुसरा गोल पुन्हा करता आला नाही. हैदराबादकडून फार प्रयत्न होताना दिसत नव्हता.
हैदराबादच्या खेळाडूंना बार्थोलोमेव ऑग्बेचेसाठी संधी निर्माण करताना येत नव्हती आणि हैदराबादसाठी हिच मोठी डोकेदुखी बनली होती. ७४व्या मिनिटाला ऑग्बेचेने ऑन टार्गेट सुरेख प्रयत्न केला, परंतु विशाल कैथने तो रोखला. पण, ऑग्बेच्या त्या प्रयत्नाने हैदराबादच्या ताफ्यात एक ऊर्जा फुंकली आणि त्यानंतर त्यांच्याकडून आक्रमक खेळ होण्यास सुरुवात झाली. आता मोहन बागानने बचावावर भर देताना बचावपटू मैदानावर उतरवला. ८४व्या मिनिटाला सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये हमरीतुमरी झाली आणि हैदराबादला फ्री किक दिली गेली. त्यावरही हैदराबादला बरोबरीचा गोल करता आला नाही.
मोहन बागानविरुद्ध जय-पराजयाची आकडेवारी गतविजेत्या हैदराबादच्या बाजूने नव्हती आणि या सामन्यात तेच चित्र दिसले. यापूर्वीच्या ८ सामन्यांपैकी त्यांना केवळ १ विजय मिळवता आला होता. एटीके मोहन बागानने ३ विजय मिळवले होते, तर ४ सामने अनिर्णित राहिले होते. आज मोहन बागानने आणखी एक विजय पदरी जमा केला. भरपाईच्या ७ मिनिटांत हैदराबादकडून प्रयत्न झाले, परंतु खेळाडूंमध्ये नैराश्यच अधिक दिसले. मोहन बागानने आज विजय मिळवून १३ गुणांसह तालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली. ((Haydrabad FC vs ATK Mohun Bagan FC))
निकाल : एटीके मोहन बागान १ ( ह्युगो बौमोस ११मि. ) विजयी वि. हैदराबाद एफसी ०. (Hyderabad FC’s second defeat in a row; ATK Mohun Bagan on 4th place with win!)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाणी काढण्यासाठी सूर्या स्वतः उतरला मैदानात, व्हिडिओ होतोय व्हायरल
‘या’ दिग्गज खेळाडूचा पाकिस्तानला घरचा आहेर; म्हणाला, ‘पाकिस्तानमध्ये एवढा दम..’