भारतीय क्रिकेट संघाचा २९ वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करुनही त्याच्यावर दुर्लक्ष केले जात आहे. काही दिवसांपुर्वी माजी भारतीय वेगवान गोलंदाज कारसन घावसरी यांनी उनाडकटविषयी धक्कादायक खुलासा केला होता. शानदार प्रदर्शन आणि कामगिरीतील सातत्यानंतरही वयामुळे उनाडकटला पुन्हा भारतीय संघात जागा मिळणार नसल्याचे घावरी यांनी सांगितले होते. यावर आता उनाडकटने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सौराष्ट्र संघाचे माजी प्रशिक्षक राहिलेल्या घावरी यांनी म्हटले होते की, “मी रणजी ट्रॉफी २०१९-२० अंतिम सामन्यादरम्यान संघ निवडकर्त्यांना अप्रत्यक्षपणे एक प्रश्न विचारला होता. जर एखादा वेगवान गोलंदाज १० सामन्यात ६० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेत असेल आणि आपल्या संघाला रणजी ट्रॉफी अंतिम फेरीत पोहोचवत असेल, तर त्याची भारत अ संघात निवड केली जावी का? यावर निवडकर्त्यांनी उत्तर दिले होते की, भावा, आता उनाडकटची भारतीय संघात निवड होणार नाही. साधे त्याचे नाव ३० खेळाडूंमध्येही गणले जाणे अशक्य आहे. कारण तो आता ३२-३३ वर्षांचा झाला आहे आणि हीच गोष्ट त्याच्याविरोधात उभारली आहे.”
“भारतीय संघ वाढत्या वयाच्या खेळाडूंवर का विश्वास ठेवेल? ते २१-२२ किंवा २३ वर्षांच्या खेळाडूंना निवडतील. जेणेकरुन तो खेळाडू पुढील ८ ते १० वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करू शकेल. जर आज उनाडकटची निवड केली गेली तर तो पुढे किती वर्षे भारतीय संघाकडून खेळू शकेल?,” असे त्या निवडकर्त्यांनी घावरी यांना म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले होते.
यावर प्रत्युत्तर देताना उनाडकट म्हणाला की, “मी ३३ नाही २९ वर्षांचा आहे. मी माझे कसोटी पदार्पण फार पुर्वीच केले होते. कदाचित यावरुनच निवडकर्त्यांना काही गैरसमज झाला असावा. जरी असे काही झाले असले तरीही, माझी फिटनेस माझ्या मैदानी कामगिरीला सिद्ध करते. मी नुकतीच यो-यो चाचणीही उत्तीर्ण केली आहे. म्हणून माझ्या वयामुळे माझ्या प्रदर्शनाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.”
“संघ निवडकर्त्यांनी माझ्यावर दुर्लक्ष करणे अतिशय निराशाजनक आहे. खासकरुन आता भारतीय संघाचा मोठा ताफा एका दौऱ्यावर (इंग्लंड दौरा) जाणार आहे. त्यामुळे मी अपेक्षा करत होतो की, मला संधी मिळेल. परंतु नेहमीप्रमाणे शेवटी माझ्यावर दुर्लक्ष केले गेले. मला आता एवढ्यावर स्वत:ला समाधानी ठेवावे लागणार आहे. मी माझे उत्कृष्ट दिले, तरीही भारतीय संघात माझी निवड होत नाही. यापेक्षा जास्त मी अजून काय करू शकतो. मी लोकांना जाऊन विचारुही शकत नाही की, माझी निवड का केली गेली नाही?,” अशा शब्दात उनाडकटने त्याचा संताप व्यक्त केला आहे.
मागील ११ वर्षांपासून पुनरागमनाच्या प्रतिक्षेत
उनाडकटने २०१९-२० रणजी ट्रॉफी हंगामात शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले होते. त्याने या पूर्ण हंगामात तब्बल ६७ विकेट्स घेतल्या होत्या. १० सामन्यातील १६ डावात गोलंदाजी करताना त्याने हा पराक्रम केला होता. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका हंगामात कोणत्या वेगवान गोलंदाजाने घेतलेल्या त्या सर्वाधिक विकेट्स ठरल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्र संघाने रणजी ट्रॉफी जिंकली होती.
परंतु मागील ११ वर्षांपासून भारतीय कसोटी संघात आणि ८ वर्षांपासून वनडे आणि २ वर्षांपासून टी२० संघात पुनरागमन करण्याची त्याची प्रतिक्षा कधीही संपणार नाही असे दिसत आहे.