---Advertisement---

सामना जिंकूनही विराट कोहलीला या खेळाडूबद्दल वाटले वाईट

---Advertisement---

हॅमिल्टन। काल(29 जानेवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. तसेच 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.

या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे त्याला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचे वाईट वाटले. तसेच विराट असेही म्हणाला की विलियम्सनने केलेल्या शानदार 95 धावांच्या खेळीमुळे एकावेळी आम्ही पराभूत होऊ असे वाटले होते.

या सामन्यात भारताने दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून केन विलियम्सनने 48 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 95 धावा केल्या होत्या. मात्र न्यूझीलंडला केवळ शेवटच्या चार चेंडूत 3 धावांची गरज असताना तो बाद झाला.

विलियम्सनबद्दल विराट म्हणाला, ‘अविश्वसनीय. मला एकावेळी वाटले होते की आम्ही पराभूत होऊ. केन विलियम्सन 95 धावांवर खेळत होता आणि त्याची खेळी शानदार होती. मी आमच्या प्रशिक्षकाला म्हटलेही की विलियम्सनने ज्याप्रकारे फलंदाजी केली आणि त्याच्या संघाचे नेतृत्व केले ते पहाता हा सामना जिंकण्यासाठी ते देखील पात्र होते.’

‘मला विलियम्सनबद्दल वाईट वाटले. कारण जेव्हा अशी खेळी तूम्ही खेळता आणि तरीही तूम्ही पराभूत होता तेव्हा काय भावना असतात हे मला माहित आहे.’

तसेच विराट पुढे म्हणाला, ‘मला वाटले होते की आम्ही एकाक्षणी पराभूत होऊ, पण जेव्हा शमीने शेवटच्या षटकातील 2 चेंडू निर्धाव टाकले, त्यानंतर 1 चेंडू 1 धाव असे समीकरण झाले होते. त्यावेळी मी विचार केला, की सामना सुपर ओव्हरमध्ये जाऊ शकतो.’

‘पण सुपर ओव्हरबद्दल चर्चा करताना आम्ही विचार केला की न्यूझीलंड दबावामध्ये असेल की त्यांच्या हातातून सामना निसटला आणि आता आमची वेळ होती की त्यावर आम्ही प्रहार करु. पण पुन्हा एकदा विलियम्सनने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर शानदार खेळ केला. त्यामुळे पुन्हा आम्ही दबावात आलो. हा सामना सि-सॉ सारखा होता. जेव्हा तूम्हाला माहिती नसते काय करायचे तेव्हा तूम्ही फक्त एक गोष्ट करु शकता ती म्हणजे शांत रहाणे आणि काय होत आहे, ते पहाणे आणि मग तूम्ही जे सर्वोत्तम करु शकता ते करणे.’

या सामन्यात भारताने निर्धारित 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंडला 180 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज होती.

यावेळी भारताकडून शमीने गोलंदाजी करत उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत या षटकात तिसऱ्या चेंडूवर केन विलियम्सनला तर शेवटच्या चेंडूवर रॉस टेलरला बाद केले. त्यामुळे न्यूझीलंडलाही निर्धारित 20 षटकात 6 बाद 179 धावा करता आल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 17 धावा केल्या. यामध्ये विलियम्सनने 11 धावा केल्या होत्या तर गप्टिलने 5 धावा केल्या होत्या. त्यानंतर 18 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुलने मिळून 20 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. सुपर ओव्हरमध्ये रोहितने 15 आणि राहुलने 5 धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---