काल कोलंबो मधील आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत भारताला निदाहास ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे त्याचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.
त्याच्या या षटकारामुळे भारताला बांग्लादेशवर ४ विकेट्सने विजय मिळवता आला. याबद्दल सामना संपल्यानंतर बोलताना कार्तिक म्हणाला, ” अशा प्रकारच्या फटक्यांचा मी सराव करत होतो. स्वतःला मजबूत स्थितीत आणायचे आणि मग तिथून फटकेबाजी करायची.”
पुढे कार्तिक म्हणाला, ” आज मी जिथे आहे त्याचा मला आनंद आहे. मागील काही महिन्यांपासून ज्या सपोर्ट स्टाफने मला पाठिंबा दिला त्यांचे धन्यवाद.”
कार्तिक काल ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. तो ज्यावेळी फलंदाजीला आला त्यावेळी भारतीय संघावर बराच दबाव होता. भारताला विजयासाठी १२ चेंडूत ३४ धावांची गरज होती. याचवेळी कार्तिकने फलंदाजीला आल्यावर पहिल्याच ३ चेंडूंवर दोन षटकार आणि १ चौकार मारत भारताचा दबाव कमी केला.
पण तरीही दोन्ही संघांना विजयाची संधी होती. सामन्याच्या विजयाचे नाट्य अखेरच्या चेंडूपर्यंत रंगले होते. भारताला शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना कार्तिकने षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला.
कार्तिकने सामना सुरु होण्याआधी ‘हा या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही याचा शेवट अनोख्या पद्धतीने करु’ असा ट्विट केला होता आणि ते त्याने काल खरे करूनही दाखवले आहे.
Last day of the tour, wish we finish it off in style#nidahastrophy #finalstime @ R. Premadasa… https://t.co/SKhf1FJBwh
— DK (@DineshKarthik) March 18, 2018