नवी दिल्ली – भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) याच्याबद्दल एक मोठे विधान केले आहे. ‘भारतीय संघात धोनी खेळत असताना आपल्याला संधी मिळणार नाही, हे मला ठाऊक होते.’ असे साहा याने म्हटले आहे.
मात्र, आपण त्याच्याकडून खुप काही शिकलो आहोत…
‘स्पोर्ट तक’ या माध्यमासोबत वृद्धिमान साहा याने संवाद साधला. त्यावेळी त्याने आपल्या करिअरच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ‘महेंद्रसिंग धोनी भारतीय संघात खेळत असताना आपल्याला संधी मिळणार नाही, हे ठाऊक होते. मात्र, धोनीकडून आपण बरेच काही शिकलो आहोत’ असेही साहा याने म्हटले आहे.
‘धोनी संघात असेपर्यंत मला मैदानात यष्टीरक्षक म्हणून संधी मिळणार नसल्याचे माहित होते. मात्र, आपण त्यानंतरही धोनीची जागा घेतलेली नाही. तर त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर आपल्याला संधी मिळाली’ असे वृद्धिमान साहा याने म्हटले.
असे झाले साहाचे पदार्पण…
आपल्या पदार्पणाविषयी साहा याने सांगितले की, ‘व्हीव्हीएम लक्ष्मण याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात तो खेळू शकला नाही आणि त्याच सामन्यात मला पदार्पण करण्याची संधी मिळाली.’
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नागपूर येथील कसोटी सामन्यासाठी लक्ष्मणऐवजी रोहित शर्माला बोलावण्यात आले होते. रोहितसोबत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण साहा याने यावेळी सांगितली. ‘सामन्याच्या दिवशी रोहित आणि मी सराव करत असताना एकमेकांना धडकलो. त्यावेळी आमच्या दोघांच्या घोट्याला दुखापत झाली होती. रोहित तर अधिकच जखमी झाला होता.’ असे साहा याने सांगितले.
त्या सामन्यात धोनीने मला क्षेत्ररक्षक म्हणून घेतले…
‘नागपूर येथील सामन्यावेळी धोनी नाणेफेक करण्यासाठी जात होता. त्यावेळी त्याने मला ‘साहा तू खेळत आहेस’ असे सांगितले. मी त्याला यष्टीमागे कोण असणार, असे विचारले. तेव्हा त्याने यष्टीरक्षक तो स्वतः असेल, असे सांगितले. मात्र, मी चांगला क्षेत्ररक्षक आहे, म्हणून मी क्षेत्ररक्षण करावे, असे सांगत त्याने मला क्षेत्ररक्षक म्हणून घेतले होते’ अशी आठवण साहा याने सांगितली. २०१०मध्ये नागपुर कसोटीत धोनीच्याच नेतृत्त्वाखाली साहाने कसोटी पदार्पण केले होते.
स्टेन आणि मॉर्केलचा यांचा केला सामना…
गॅरी कर्स्टनने हे त्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यांनी आपल्याला ‘धोनी संघात आहे, तोपर्यंत मी गोलंदाजांसोबत नेटमध्ये सराव करावे’ असे सांगितले होते. यानंतर मी फलंदाज म्हणून सरावाला सुरुवात केली. त्यानंतर माझा सामना थेट डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केल यांच्यासोबत झाला, असेही साहा याने सांगितले.
मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेत पुढे गेलो…
भारतीय संघात धोनीसोबत असताना खुप काही शिकता आले, असेही साहा याने सांगितले. तसेच धोनी खेळत असेल तर आपल्याला खेळायला मिळणार नाही, हे माहित होते. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळाली, तेव्हा आपण नेहमीपेक्षा चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. असेही वृद्धिमान साहा याने म्हटले.