भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेनंतर १२ मार्चपासून ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेतील सर्व सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची निवड झाली आहे. या संघात मुंबईच्या सुर्यकुमार यादव याचाही समावेश झाला आहे. सुर्यकुमार मागील अनेक महिन्यांपासून या संधींची वाट पाहात होता. अखेर त्याला भारतीय संघाच संधी मिळाली आहे, यानंतर त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिलेल्या मुलाखतीत सुर्यकुमारने भारतीय संघात निवड झाल्यानंतर कशा भावना होत्या. तसचे भारताचा उपकर्णधार रोहित शर्माबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुर्यकुमारला रोहितबरोबर खेळण्याचा बराच अनुभव आहे. सुर्यकुमार आणि रोहित देशांतर्गत क्रिकेट एकत्र मुंबईकडून खेळतात. तसेच इंडियन प्रीमीयर लीगमध्येही मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळतात. आता हे दोघे भारतीय संघातही एकत्र खेळताना दिसणार आहेत.
त्यामुळे रोहितबद्दल सुर्यकुमारला जेव्हा प्रश्न विचारला, तेव्हा तो म्हणाला, “जेव्हा मी माझ्या पहिला रणजी सामना खेळत असताना रोहितबरोबर फलंदाजी करतानाचे क्षण मला अजून आठवतात. त्यावेळी तो माझ्याजवळ आला होता आणि म्हणाला होता, ‘मित्रा गोष्टी सोप्याच ठेव. तू इतपर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहेस. तुला आता तिथे जाऊन फक्त स्वतःची कामगिरी बजावयची आहे.”
सुर्यकुमार पुढे म्हणाला, “रोहितचा खेळाबद्दलचा, फलंदाजीबद्दलचा दृष्टिकोन किंवा युवा खेळाडूंना देत असलेला सल्ला, याच कोणताच बदल झाला नसल्याचं पाहून चांगल वाटतं. अगदी अजूनही मला तो त्याच गोष्टी सांगत असतो. त्याची उपस्थिती मला खूप मदत करते.”
तसचे सुर्यकुमार असेही म्हणाला की “रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना मी त्याच्याबद्दल आणि त्याच्या खेळाबद्दल खूप काही शिकलो आहे. तो त्याचा खेळ कसा साधा ठेवतो, त्याची खेळाबद्दलची समज, अशा अनेक गोष्टी शिकलो आहे.”
सुर्यकुमारने २०१० साली रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीविरुद्ध मुंबईकडून पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या डावातच ७३ धावांची खेळी केली होती. त्यावेळी त्याने रोहितबरोबर ६२ धावांची भागीदारीही केली होती. त्यावेळी वासिम जाफर मुंबई संघाचे कर्णधार होते.
संघात निवड झाल्याचे कळताच डोळ्यात आले अश्रू
याबरोबरच सुर्यकुमारने त्याची टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर काय भावना होत्या, याचा देखील उलगडा केला आहे. तो म्हणाला, ‘मी खुप उत्सुक होतो. मी माझ्या खोलीत बसून चित्रपट बघण्याचा प्रयत्न करत होतो आणि माझ्या फोनवर नोटीफिकेशन आले की माझी इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मी माझे नाव पाहून रडायला लागलो. मी माझ्या पालकांना, पत्नीला आणि माझ्या बहिणीला फोन केला. आम्ही व्हिडिओ कॉलवर बोललो आणि एका क्षणी आम्ही सगळेच रडायला लागलो.’
पुढे सुर्यकुमार म्हणाला, ‘माझ्याबरोबर त्यांनीही माझे हे स्वप्न जगले आहे. हा दीर्घ प्रवास होता आणि ते असे लोक आहेत, जे या संपू्र्ण प्रवासात माझ्याबरोबर होते. त्यामुळे त्यांना आनंदी पाहाताना आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहाताना खुप छान वाटले.’
सुर्यकुमार सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत होता. आता तो लवकरच अहमदाबादला टी२० मालिकेसाठी रवाना होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
लहान भावाने केले प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण, खुश झालेल्या मोहम्मद शमीने दिला ‘हा’ खास संदेश