भारतीय संघाचा युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (IND vs WI) एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 9 षटकात 12 धावा देत 4 बळी घेतले. यासोबतच प्रसिद्ध कृष्णाने तीन निर्धाव षटकेसुद्धा टाकली. याअगोदर देखील त्याने अनेक देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने प्रसिद्ध कृष्णाचे कौतुक केले आहे. हरभजनने सांगितले की, प्रसिद्ध कृष्णाला भारताच्या टी20 विश्वचषक संघात बघायचे आहे.
हरभजन सिंगने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, “या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने आपली क्षमता दाखवली आहे. भविष्यात तो कसोटी क्रिकेटमध्येही सहभागी होईल असे मला वाटते. तो आता एकदिवसीय सामने खेळत आहे आणि मला त्याला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकात बघायचे आहे. ऑस्ट्रेलियात मोठी मैदाने आहेत. त्याच्या उंची आणि वेगाचा भारतीय संघाला खुप फायदा होऊ शकतो.”
हरभजन म्हणाला, “जेव्हा तुम्ही संघात सामील होता, तेव्हा तुम्हाला पहिली गोष्ट करायची असते ती म्हणजे इतरांपेक्षा वेगळी कामगिरी करणे. इतर कोणाकडे नाही, असे काहीतरी करणे. कृष्णाकडे इतर गोलंदाजांपेक्षा जास्त वेग आहे. त्याच्याकडे एक सहज ऍक्शन आहे आणि खूप चांगला रनअप आहे.”
पुढे हरभजन सिंग म्हणाला की, जसप्रीत बुमराह भारतीय संघात आला, तेव्हा तो आजच्यासारखा सक्षम गोलंदाज नव्हता. प्रसिद्ध कृष्णाने भारतीय संगाकडून ६ ते ८ महिने नियमित खेळल्यास तो आणखी चांगला गोलंदाज बनू शकेल. तो शेवटी म्हणाला की, त्याला खात्री आहे की जसप्रीत बुमराह-प्रसिद्ध कृष्णा जोडी पुढील काळात भारतीय क्रिकेट संघासाठी खूप चांगली कामगिरी करेल.
प्रसिद्ध कृष्णाने भारतीय संघासाठी आतापर्यंत खेळलेल्या ६ वनडेमध्ये १५ विकेट घेतल्या आहेत. याआधी त्याने ९ प्रथम श्रेणी सामन्यात ३४ बळी घेतले आहेत. कृष्णाने लिस्ट ए च्या ५६ सामन्यात ९९ बळी घेतले आहेत. त्याने टी२० सामन्यांमध्येही चांगली कामगिरी करत ५४ टी२० सामन्यात ४८ विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-वेस्ट इंडिज टी२० मालिकेसाठी प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश? जाणून घ्या सविस्तर
तिसरा वनडे सामना ३-० ने जिंकून रोहित अँड कंपनी तोडणार ‘हा’ ३९ वर्षांपासून न तुटलेला रेकॉर्ड
विश्वचषकासाठी भारताच्या ‘या’ सलामीवीराला करा तयार, माजी फिरकीपटूचा कामाचा सल्ला