विस्डेन पुरस्कार हा आयसीसीचा पुरस्कार नाही. परंतु याचे महत्त्व आयसीसीकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नाही. विस्डेनने काही दिवसांपूर्वीच २०१९च्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंची घोषणा केली होती.
विस्डेनने इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या २०१९ विश्वचषक आणि ऍशेसमध्ये चमकदार कामगिरी करणारा इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे.
यानंतर या वर्षातील सर्वोत्तम ५ खेळाडूंची यादीही जाहीर केली आहे. यामध्ये विश्वचषकात ५ शतकं ठोकणाऱ्या भारतीय संघाचा रोहित शर्माचा (Rohit Sharma) नावाचा समावेश केला नाही. त्यामुळे भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मणने (VVS Laxman) आश्चर्य व्यक्त केले आहे.
विस्डेनने (Wisden) स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसा पेरी (Ellyse Perry) या दोन खेळाडूंना २०१९मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. तसेच वेस्ट इंडीजचा फलंदाज आंद्रे रसेलची (Andre Russell) आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे.
या व्यतिरिक्त वर्षातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये एलिसा पेरी, वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, युवा फलंदाज मार्नस लॅब्यूश्याने, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि दक्षिण आफ्रिकेचा सायमन हार्मर या खेळाडूंचा समावेश आहे.
विस्डेन केवळ इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच या यादीत सामील करतात.
विस्डेनच्या या यादीवर प्रश्न उपस्थित करत लक्ष्मणने विचारले की, “२०१९ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत रोहितच्या नावाचा समावेश का केला नाही? इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या वनडे विश्वचषकात रोहितने ५ शतके ठोकली होती. त्याचा या यादीत समावेश करण्यासाठी योग्य होता. जो व्यक्ती ही यादी पाहील, त्यावेळी रोहितचे नाव नाही हे पाहून आश्चर्यचकीत होईल.”
भारताकडून १३४ कसोटी सामने खेळणारा लक्ष्मण एका लाईव्ह कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, “निश्चितच ऍशेस एक महत्त्वाची मालिका आहे. परंतु हेही खरंच आहे की विश्वचषक हा ऍशेस मालिकेपेक्षा मोठा आहे. विश्वचषकात ५ शतके ठोकणे ही मोठी गोष्ट आहे.”
“जर तुम्हाला लक्षात असेल, तर रोहितने पहिले शतक हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साउथँम्पटनच्या एका कठीण खेळपट्टीवर केले होते. जिथे दुसऱ्या फलंदाजांना धावा करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती. याव्यतिरिक्त रोहितने पाकिस्तानविरुद्धही महत्त्वाची खेळी केली होती,” असेही लक्ष्मण यावेळी म्हणाला.
रोहितने २०१९मधील विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. या विश्वचषकात त्याने ९ सामन्यात ८१च्या सरासरीने ६४८ धावा केल्या होत्या. त्याने २०१९मध्ये ५७पेक्षा अधिक सरासरीने १४९० धावा केल्या होत्या. इतकेच नव्हे तर त्याने एका वर्षात एकूण ७ शतके ठोकली होती. यामधील ५ शतके तर त्याने विश्वचषकात केले होते.
कोणत्याही एका विश्वचषकात ५ शतके करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. असे असूनही विस्डेनच्या यादीत रोहितचे नाव येत नसेल तर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
ट्रेंडिंग घडामोडी-
-धोनीच्या निवृत्तीवर पाकिस्तानी क्रिकेटरने केले भाष्य, चाहत्यांनी वाहिली शिव्यांची लाखोली
-पैसे नसल्याने साध्या बसने क्रिकेट खेळायला जाणाऱ्या जगातील मोठ्या संघावर कोरोनामुळे संकट