क्रिकेट म्हटलं की, त्याचे खास नियमही आलेच. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच आयसीसी (ICC)ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी काही विशेष नियम बनवलेले आहेत. आता याच नियमांवलीत त्यांनी नव्या नियमाची भर (ICC Announces New Rule) पाडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात छोटे स्वरुप, टी२० क्रिकेटशी हा नियम संबंधित आहे (T20 Cricket New Rule). या नियमामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला त्यांची एक चूक खूप महागात पडू शकते. एकूणच आयसीसीने टी२० च्या प्लेइंग कंडिशनमध्ये बदल केले आहेत.
या नियमाअंतर्गत गोलंदाजी करणाऱ्या संघाला कोणत्याही परिस्थितीत निश्चित वेळेच्या आत आपल्या कोट्यातील षटके पूर्ण करावी लागणार आहेत. जर संघाने आपली षटके निर्धारित वेळेत पूर्ण केली नाहीत, तर उर्वरित षटकांमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाचा एक क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी उभा राहू शकणार नाही. त्याला ३० यार्डच्या आतच क्षेत्ररक्षणासाठी उभे राहावे लागेल. यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला मोठे नुकसान झेलावे लागू शकते.
सध्या टी२० क्रिकेट सामन्यात पावरप्लेनंतर ५ क्षेत्ररक्षक ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर उभे राहतात. परंतु या नव्या नियमानंतर फक्त ४ क्षेत्ररक्षक या अंतराच्या बाहेर उभे राहू शकतील.
याव्यतिरिक्त द्विपक्षीय मालिकांमधील दर डावादरम्यान अडीच मिनिटांचा पर्यायी ड्रिंक्स ब्रेक घेण्याचाही (Optional Drinks Break Interval) नियम लागू करण्यात आला आहे. परंतु हा नियम तेव्हाच लागू करण्यात येईल, जेव्हा मालिकेपूर्वी उभय संघ यासाठी सहमत असतील.
टी२० क्रिकेटमधील मोठ्या बदलांशी संबंधित असलेले हे नियम वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड यांच्यात १६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकमेव टी२० सामन्यापासून लागू होतील. तसेच महिला क्रिकेटमध्ये हे नवे नियम दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील सेंच्यूरियनमधील टी२० सामन्याने अंमलात आणले जातील. हा सामना १८ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.
आयसीसीने या नियमांची घोषणा करताना म्हटले आहे की, स्लो ओवर रेटसाठी आधीपासूनच पेनल्टीचे नियम ठरलेले आहेत. आता या नियमासोबत अजून एक नियम जोडला गेला आहे. याअंतर्गत क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाला निर्धारित वेळेच्या आत अंतिम षटकाचा पहिला चेंडू टाकण्याच्या स्थितीत राहावे लागणार आहे. जर संघ असे करण्यात अपयशी ठरला, तर नव्या नियमानुसार त्यांचा एक क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या बाहेर उभा राहू शकणार नाही. हा नियम आयसीसी क्रिकेट कमिटीच्या शिफारसीनंतर लागू करण्यात आला आहे.
द हंड्रेड क्रिकेट लीगमध्ये यशस्वीरित्या या नियमाचा वापर केला गेल्यानंतर आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे क्रिकेटच्या सर्व स्वरुपातील सामन्यांचा वेग सुधारण्यास मदत होईल.
महत्त्वाच्या बातम्या-