---Advertisement---

कोरोनाचा क्रिकेटला पुन्हा खो! आयसीसीने रद्द केली ‘ही’ प्रमुख स्पर्धा

On: रविवार, नोव्हेंबर 28, 2021 5:35 PM
---Advertisement---

कोविड महामारीमुळे गेली दोन वर्षे संपूर्ण जग विस्कळीत झाले आहे. याचा खेळ जगतावर देखील खूप मोठा परिणाम झाला. आता या महामारीने पुन्हा डोकेवर काढले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शनिवारी (२७ नोव्हेंबर) हरारे येथे पुढील वर्षी होणाऱ्या महिला वनडे विश्वचषक स्पर्धेसाठीची पात्रता फेरी रद्द केली. आफ्रिकन देशांत कोविड-१९ चा नवीन प्रकार आढळल्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. यासह पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश क्रमवारीच्या आधारे पात्र ठरले आहेत. दक्षिण आफ्रिकेत नवीन प्रकार आढळल्याने जगभरात दहशत निर्माण झाली असून, ज्यामुळे अनेक आफ्रिकन देशांतील प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे.

आयसीसीने म्हटले आहे की, ओमिक्रॉन प्रकार वाढल्यानंतर सहभागी संघ कसे परततील या चिंतेमुळे स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नऊ संघांच्या प्राथमिक लीग स्पर्धेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘स्पर्धेतील खेळाच्या अटींमध्ये नमूद केलेल्या संघाच्या क्रमवारीच्या आधारे पात्रता फेरी निश्चित केली जाईल. त्यामुळे बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज आता न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरतील.’ झिम्बाब्वेविरुद्ध पाकिस्तान आणि अमेरिका विरुद्ध थायलंड यांच्यातील दोन नियोजित सामने शनिवारी (२७ नोव्हेंबर) सुरू झाले होते. परंतु, श्रीलंकेच्या संघाच्या सपोर्ट स्टाफच्या सदस्याची कोविड चाचणी पॉसिटीव्ही आल्यामुळे वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील सामना खेळला जाऊ शकला नाही.

आयसीसी स्पर्धांचे प्रमुख ख्रिस टेटली म्हणाले, ” या स्पर्धेचे उर्वरित सामने रद्द केल्यामुळे आम्ही खूप निराश झालो आहोत, परंतु इतक्या कमी कालावधीत अनेक आफ्रिकन देशांमध्ये प्रवास बंदी लागू झाल्यामुळे, संघांना परत आणण्यास अडचणी आल्या असत्या. चार मार्च ते तीन एप्रिलपर्यंत न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश आहेत.

निवेदनानुसार, आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या (२०२२ ते २०२५) तिसर्‍या फेरीतील संघांची संख्या आठवरून १० करण्यात आली आहे. यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, बांगलादेश या संघांसह श्रीलंका आणि आयर्लंड देखील असतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---