भारतानं पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास नकार दिला आहे. त्यानंतर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळली जाणार की नाही? याची पुष्टी अद्याप झालेली नाही. गुरुवारी पीसीबीनं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं, जे 16 नोव्हेंबरपासून इस्लामाबादमधून सुरू होणार होतं. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीनं यावर कडक कारवाई करत हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
वास्तविक, पीसीबीनं ट्विट केलं होतं, “पाकिस्तान तयार व्हा. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ट्रॉफी दौरा 16 नोव्हेंबरपासून इस्लामाबादमध्ये सुरू होईल, जो स्कर्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद सारख्या पर्यटन स्थळांना भेट देईल. 16-24 नोव्हेंबर दरम्यान ओव्हल येथे 2017 मध्ये सरफराज अहमदनं जिंकलेल्या ट्रॉफीची एक झलक पाहा.”
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा दौरा पाकव्याप्त काश्मीरमधील स्कर्दू, हुंझा आणि मुझफ्फराबाद या शहरांमधून आयोजित केला होता. आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत कोणताही मोठा वाद नको आहे. या कारणामुळे त्यांनी ट्रॉफी दौऱ्याचे बेत रद्द केले.
‘जिओ न्यूज’च्या दुसऱ्या वृत्तात म्हटलं आहे की, आयसीसीनं बीसीसीआयला या स्पर्धेसाठी पाकिस्तानला न जाण्याच्या कारणांचं लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. बीसीसीआयनं आयसीसीला आपल्या निर्णयाची तोंडी माहिती दिल्यानंतर हे घडलं. हे पीसीबीला देखील कळविण्यात आलं आहे.
‘एएनआय’नं जिओ न्यूजच्या सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, लेखी उत्तर मिळाल्यास पाकिस्तान या कारणांचं समर्थन करण्यासाठी ठोस पुरावे मागू शकतो. त्या कारणांचा आढावा घेऊन आयसीसी भारताबाबत अंतिम निर्णय घेईल.
आयसीसीनं अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. बीसीसीआयनं आयसीसीला प्रस्ताव दिला आहे की, ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार आयोजित करावी आणि टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करावेत. पीसीबी स्पर्धेचं यजमानपद वाटून घेण्याच्या बाजूनं नाही. पीसीबी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद गमवावंही लागू शकतं.
हेही वाचा –
“पाकिस्तानात खूप दहशतवाद….”, बीसीसीआयनं आयसीसीला स्पष्टच सांगितलं!
विराट कोहलीला दुखापत झाली का? कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन मीडियातर्फे माइंड गेम सुरू
पहिल्या कसोटीपूर्वी भारताचे दिग्गज फलंदाज फ्लॉप! नवख्या गोलंदाजांपुढे शरणागती पत्कारली