ज्या क्षणाची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे. आयसीसीने मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कराची येथे होईल.
टीम इंडिया या स्पर्धेत केव्हा आणि कोणाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल हे जाणून घेण्यात तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपला पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. हा सामना दुबईत खेळला जाईल.
भारतीय संघ आपला पुढचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध 23 फेब्रुवारीला खेळेल. हा सामना देखील दुबईत होणार आहे. हे दोन्ही संघ शेवटचे 2024 टी20 विश्वचषकात आमनेसामने आले होते. भारतीय संघ ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. हा सामना 2 मार्चला दुबईत खेळला जाणार आहे.
बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर स्पर्धेतील भारताचे सर्व सामने हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. जर भारतीय संघ सेमीफायनल आणि फायनलमध्ये पोहचला, तर हे सामने देखील दुबईत खेळले जाणार आहेत.
या स्पर्धेत भारतीय संघ ग्रुप ए मध्ये आहे. टीम इंडियासोबत या ग्रुपमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे अन्य तीन संघ आहेत. स्पर्धेच्या ग्रुप बी मध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे चार संघ आहेत. प्रत्येक ग्रुपमधून टॉप 2 संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारताचे सामने
20 फेब्रुवारी – विरुद्ध बांगलादेश – दुबई
23 फेब्रुवारी – विरुद्ध पाकिस्तान – दुबई
2 मार्च – विरुद्ध न्यूझीलंड – दुबई
हेही वाचा –
मोठी बातमी: आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे वेळापत्रक जाहीर! या दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान मुकाबला
IND vs AUS; गिल, पंत, जयस्वालबद्दल कर्णधार रोहित शर्माचे मोठे वक्तव्य! म्हणाला….
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फिट झाला हा मॅचविनर गोलंदाज