भारतीय क्रिकेट इतिहासात १९९९ ते २००० हा काळ नेहमीच एक भयानक स्वप्न म्हणून आठवला जातो. हाच तो काळ होता, जेव्हा भारतीय क्रिकेट संघाला मॅच फिक्सिंगचा काळा डाग लागला होता.
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) त्यावेळी नेतृत्वाची जबाबदारी घेत संघाला यातून बाहेर काढण्यासाठी कठोर परिश्रम घेतले होते. त्यामुळे पुन्हा एकदा संघाने तो गमावलेला मान मिळविला होता. मात्र आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटच्या ताज्या वक्तव्यामुळे बीसीसीआयच्या चिंतेत भर पडली आहे. कारण त्यांनी असे म्हटले, की मॅच फिक्सिंगच्या बाबतीत भारत एक नवीन अड्डा बनत आहे.
आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटने हे स्पष्ट केले आहे, की सध्या ते फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी करत आहेत. त्यातील बहुतेक सर्व प्रकरणे भारताशी जोडलेली आहेत. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगनंतर सट्टेबाज देशांतर्गत स्पर्धेला लक्ष्य करत आहेत.
हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटचे अधिकारी स्टीव्ह रिचर्डसन (Steve Richardson) यांनी एक निवेदन जारी केले आहे, की सध्या ५० प्रकरणे भारताशी संबंधित आहेत. परंतु यामध्ये कोणत्याही खेळाडूचे नाव समाविष्ट नाही.
ते म्हणाले, “आम्ही सध्या भ्रष्टाचाराशी संबंधित बर्याच प्रकरणांची चौकशी करत आहोत. आणि यातील ५० प्रकरणे भारताशी संबंधित आहेत. खेळाडू साखळीचा शेवटचा भाग असतात. अडचण अशी आहे, की जे खरोखरच त्याच्याशी जोडले आहेत. ते मैदानाच्या बाहेर बसतात. मी भारतीय सरकारी एजन्सींना अशी ८ नावे देऊ शकतो. जे खेळाडूंना पैसे देऊन त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत.”
विशेष म्हणजे गेल्या वर्षी आयोजित केलेल्या टी२० केपीएल (कर्नाटक प्रीमियर लीग) मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात अनेक आरोपी सापडले होते. तसेच खेळाडूंबरोबरच संघाच्या मालकांची नावेही यामध्ये समाविष्ट होती. या लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल करून चौकशी सुरू आहे.
बीसीसीआयचे एसीयू अध्यक्ष अजित सिंह म्हणाले, “हे सर्व बेकायदेशीर सट्टेबाजीतून पैसे मिळवण्यासाठी केले गेले आहे. यासाठी संघाचे अधिकारी, मालक, क्रीडा कर्मचारी आणि खेळाडू यांच्याशी संपर्क साधला जातो. ”
मॅच फिक्सिंगबाबत आयसीसीचा म्हणणे आहे, की भारत जोपर्यंत मॅच फिक्सिंगबाबत कठोर कायदा करत नाही आणि गुन्हा घोषित केला जात नाही, तोपर्यंत भारताची परिस्थिती सुधारणार नाही.
रिचर्डसन म्हणाले, “मॅच फिक्सिंगविरुद्ध कायदा आणणारा श्रीलंका पहिला देश होता. त्यामुळे तेथे क्रिकेट सुरक्षित आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गोष्टी बर्याच चांगल्या आहेत. परंतु भारतात असा कोणताही कायदा नाही. ज्यामुळे तेथे बीसीसीआय उघडपणे कार्य करू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले, ऑस्ट्रेलियाच्या कायद्यानुसार कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी ते कोणालाही त्यांंच्या देशात येण्यापासून रोखू शकतात. भारतात २०२१ टी२० विश्वचषक आणि २०२३ वनडे विश्वचषक होणार आहे. त्यामुळे कायद्यात असा बदल होणे फार महत्त्वाचे ठरू शकते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-“…तर मी भारतीय संघातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होऊ शकलो असतो”
-तो दादाच आहे… अगदी ट्विटरवरही इंग्लडच्या नासीर हुसेनला ठरला भारी
-‘या’ क्रिकेटपटूचा झाला कार अपघात; डोक्याला लागला मार