अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरु असेल्या टी20 विश्वचषकादरम्यान आयसीसीनं लेटेस्ट टी20 रँकिंग जारी केलं आहे. यामध्ये ऑलराउंडर्सच्या रँकिंगमध्ये सर्वात मोठा बदल झाला असून, अफगाणिस्तानचा दिग्गज मोहम्मद नबी पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यानं बांगलादेशच्या शकिब अल हसनची जागा घेतली.
चालू टी20 विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद नबी शानदार फार्मात असून याचा त्याला फायदा झाला. तो दोन स्थानांची झेप घेत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. आतापर्यंत शाकिब अल हसन अष्टपैलूंच्या टी20 क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. मात्र टी20 विश्वचषकात त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही. यामुळे त्याची घसरण झाली. तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस तीन स्थानांची झेप घेऊन दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगा एका स्थानाच्या नुकसानासह तिसऱ्या स्थानावर आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा चौथ्या स्थानावर कायम आहे.
आयपीएल 2024 मध्ये खराब फॉर्मत असलेल्या हार्दिक पांड्यानं टी20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्यानं आयर्लंडविरुद्ध 3 आणि पाकिस्तानविरुद्ध 2 बळी घेतले होते. त्याला अष्टपैलूंच्या क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला असून, तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे.
टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर तर यशस्वी जयस्वाल सहाव्या स्थानावर कायम आहे. त्याचवेळी इंग्लंडचा फिल सॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एका स्थानाचा फायदा होऊन तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लिश कर्णधार जोस बटलरला दोन स्थानांचा फायदा होऊन तो पाचव्या स्थानावर, वेस्ट इंडिजचा ब्रेंडन किंगला एका स्थानाचा फायदा होऊन सातव्या स्थानावर, एडन मार्करमला तीन स्थानांचा फायदा होऊन आठव्या आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेडला सहा स्थानांचा फायदा होऊन तो पहिल्या दहामध्ये पोहोचला आहे.
इंग्लंडचा आदिल रशीद आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा हे गोलंदाजांच्या टी20 क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. त्याचवेळी अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानला चार स्थानांचा फायदा होऊन तो तिसऱ्या स्थानावर आलाय. फझलहक फारुकी आणि ॲनरिक नॉर्किया संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडला एका स्थानाचं नुकसान होऊन तो सहाव्या स्थानावर पोहाचलाय. तर भारताचा अक्षर पटेल चार स्थानांच्या नुकसानासह सातव्या आणि रवी बिश्नोई सहा स्थानांच्या नुकसानासह दहाव्या स्थानावर घसरलाय.
महत्त्वाच्या बातम्या –
नामिबियाच्या कर्णधारानं केला लाजिरवाणा विक्रम, टी20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं!
कोण आहे पाकिस्तानविरुद्ध दमदार फलंदाजी करणारा ॲरॉन जॉन्सन? कॅनडाच्या खेळाडूबद्दल मनोरंजक गोष्टी जाणून घ्या
भारत-पाकिस्तान सामन्यात सट्टेबाजांची चांदी! कॅनेडियन रॅपरनं जिंकले कोट्यवधी रुपये