आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या आवृत्तीत दहावा सामना नेदरलॅंड्स विरुद्ध नामिबिया यांच्यात मंगळवारी (१० फेब्रुवारी) खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नेदरलॅंड्सने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. यामध्ये बास दी लीडे याने अष्टपैलू कामगिरी करत संघाला दोन गुण मिळवून दिले. तोच या ‘प्लेयर ऑफ दी मॅच’ ठरला.
या सामन्यासाठी झालेल्या नाणेफेकीत नेदरलॅंड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या मैदानावर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या नामिबियाची सुरूवात चांगली झाली नाही. त्यांनी १० धावसंख्येवरच पहिली विकेट गमावली. दुसऱ्या विकेटसाठी लोफ्टी इटॉन आणि जॅन फ्रायलिंकने ५० धावांची भागीदारी केली.
लोफ्टी ४२ धावा करत बाद झाला. त्यानंतर एकही मोठी भागीदारी झाली नाही. त्यामुळे नामिबियाचा डाव २० षटकात ८ बाद १५६ धावसंख्येवरच संपुष्टात आला. या डावात नेदरलॅंड्सच्या ८ खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यामध्ये लोगन वॅन बीक आणि लीडे यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यामध्ये लीडेने ३ षटकात २० धावा देत २ विकेट्स, तर लोगनने ३ षटकात १३ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलॅंड्सची पहिली विकेट १६ धावांवर, तर दुसरी ४६ धावांवर पडली. त्यानंतर मात्र कोलिन ऍकरमन आणि लीडे यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत संघाचा विजय सोपा केला. कोलिन ३२ धावा करत बाद झाला. लीडेने मग एडवर्ड्सच्या साथीने चौकार-षटकार मारले आणि संघाच्या धावफलकाचा वेग वाढवला. दोघांनी २४ चेंडूत ४३धावांची भागीदारी केली.
यामध्ये एडवर्ड्स ९ चेंडूत एक चौकार-षटकार मारत १८ धावांवर नाबाद राहिला. तसेच लीडे ४८ चेंडूत ७२ धावा करत नाबाद राहिला. त्यामध्ये त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. नेदलॅंड्सने १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
या विजयाबरोबरच नेदरलॅंड्सने टी२० विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या असोसिएट देशांच्या यादीत आणखी आघाडी घेतली आहे. त्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत ११ सामने जिंकले आहेत.
हा सामना जिंकताच नेदरलॅंड्स ग्रुप ए च्या अंकतालिकेत दुसऱ्या स्थानी आला आहे. पाकिस्तानचेही दोन अंक असून नेदरलॅंड्सचा नेट रनरेट उत्तम आहे. या स्पर्धेत नेदरलॅंड्सचा पुढील सामना यूएसएविरुद्ध १३ फेब्रुवारीला आणि नामिबियाचा सामना १२ फेब्रुवारीला भारताविरुद्ध आहे.
पुरुषांच्या टी२० विश्वचषकात असोसिएट संघांसाठी सर्वाधिक विजय
११ – नेदरलँड्स
८ – स्कॉटलंड
५ – अफगाणिस्तान
५ – नामिबिया
३ – आयर्लंड






