---Advertisement---

T20 WC26: चेपॉकवर अफगाणिस्तानच्या गुलबदीन नईबची स्फोटक खेळी, न्यूझीलंडचे सातही गोलंदाज हैरान

On: रविवार, फेब्रुवारी 8, 2026 1:05 PM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये चौथा सामना आज (८ फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात आहे. चेन्नईमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये गुलबदीन नईबने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्याने मिचेल सॅंटनर, मॅट हेन्री, जॅकॉब डफी यांच्या विरोधात उत्तम फलंदाजी करत २९ चेंडूतच अर्धशतक केले.

एमए चिदंबरम स्टेडिवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात नईबने सेदिकुल्ला अटलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारीही केली. नईब ३५ चेंडूत ६३ धावा करत बाद झाला. यामध्ये त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. ही अफगाणिस्तानकडून आतापर्यंतची टी२० विश्वचषकातील सर्वोत्तमपैकी एक खेळी ठरली आहे.

या सामन्यात न्यूझीलंडकडून सात खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यातील पाच जणांचा इकॉनॉमी रेट १०च्या वर राहिला. नईबच्या उत्तम खेळीमुळे अफगाणिस्तानने न्यूझीलंडला १८३ धावसंख्येचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स लोकी फर्ग्युसनने घेतल्या. त्याने ४ षटकात ४० धावा देत २ विकेट्स घेतल्या. तसेच डफी, हेन्री आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

अफगाणिस्तानने पॉवरप्लेमध्येच दोन विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे आजच्या सामन्यात न्यूझीलंड वरचढ ठरतो की काय असे लक्षणे दिसत असताना नईबची खेळी अफगाणिस्तानसाठी महत्वपूर्ण ठरली आहे. सध्या न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असून त्यांनाही सुरूवातीला दोन धक्के बसले आहेत. त्यांनी १.४ षटकात १४ धावसंख्येवरच रविंद्र आणि फिन ऍलनच्या विकेट्स गमावल्या आहेत.

टी२० विश्वचषकात हे दोन संघ दोनदा समोर आले. त्यातील दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. २०२४च्या विश्वचषकात अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा ८४ धावांनी पराभव केला होता.

तसेच हे दोन्ही संघ टी२० मालिका खेळून या स्पर्धेत उतरले आहेत. न्यूझीलंडने भारताविरुद्ध ४-१ अशी मालिका गमावली, तर अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे. मागील स्पर्धेतील अफगाणिस्तानची कामगिरी आणि आताची दोन्ही संघाची कामगिरी पाहता हा सामना थरारक होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---