क्रिकेटविश्वात सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आजचा (११ फेब्रुवारी) पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला गेला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्याचा निकाल पहिल्या नाहीतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये लागला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत केले. लुंगी एनगिडीने प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला.
या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉक आणि रायन रिकल्टनच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात ६ विकेट्स गमावत १८७ धावसंख्या उभारली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. राशिदने या दोघांच्याही विकेट्स घेतल्या. यामध्ये अफगाणिस्तानकडून सर्वाधिक विकेट्स अझमतुल्लाह ओमरझईने घेतल्या. त्याने ४ षटकात ४१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानने पहिली विकेट इब्राहिम जादरानच्या रुपात गमावली. तो १२ धावा करत बाद झाला. सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने एक बाजू घट्ट पकडत संघाचा विजयाच्या जवळ नेले. तो ४२ चेंडूत ८४ धावा करत बाद झाला. अफगाणिस्ताने चार खेळाडू शून्यावर बाद झाले.
शेवटच्या षटकात पोहोचलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानकडे एकच विकेट शिल्लक होती. तेव्हा त्या षटकातील चौथ्या चेंडूवर फजलहक फारुकी मार्को यान्सेनच्या चपळाईने धावबाद झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. यामध्ये एनगिडीने उत्तम कामगिरी केली. त्याने ४ षटकात २६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानकडून गुरबाज आणि अझमतुल्लाह फलंदाजीला आले. एनगिडीने टाकलेल्या त्या षटकात अफगाणिस्तानने १७ धावा वसूल केल्या. यामध्ये अझमतने दोन चौकार आणि एक षटकार मारला.
तसेच विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करण्यास दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविस फलंदाजीला आले. त्यामध्ये मिलरने पहिल्याच चेंडूवर एकेरी, तर दुसऱ्या चेंडूवर ब्रेविसने षटकार मारला आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवर तो विकेट गमावून बसला. नंतर आलेल्या ट्रिस्टन स्टब्सने एक चौकार-एक षटकार मारत सामना पुन्हा बरोबरीत केला.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून मिलर आणि स्टब्स आले. अझमतुल्लाहने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर स्टब्सने षटकार मारला. नंतर मिलरने दोन षटकार मारले आणि दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला जिंकण्यासाठी २४ धावांचे लक्ष्य दिले. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी आणि अझमत फलंदाजीला आले. दक्षिण आफ्रिकेकडून ते षटक केशव महाराजने टाकले.
नबी महाराजच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या गुरबाजने लागोपाठ तीन षटकार मारले. मात्र शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला आणि अफगाणिस्तानने ४ धावांनी सामना गमावला.
पहिला सामना गमावल्याने अफगाणिस्तानला या स्पर्धेत टिकण्यासाठी आजचा सामना जिंकणे महत्वाचे होते, मात्र त्यांनी हा पण सामना गमावल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला.






