क्रिकेटविश्वात लवकरच आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून ते १५ फेब्रुवारीला समोरा-समोर येणार होते. हा सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार असून श्रीलंकेलाही या स्पर्धेचे यजमानपद दिले आहे. याच सामन्यासाठी पाकिस्तानने खेळण्यास मनाई केली आहे. जेव्हापासून पाकिस्तानने हा निर्णय घेतला तेव्हापासून त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यांनी भारत ए विरुद्धच्या सामन्यासाठी महिला संघही जाहीर केला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) त्यांच्या सरकारच्या मंजुरीनंतर भारताविरुद्धचा सामना बहिष्कृत केला. तसेच त्यांनी कोणतीही पूर्वसुचना न देता थेट आयसीसीला त्यांचा निर्णय सांगितला. त्यांच्या या निर्णयाचे समर्थन मिळवण्यासाठी त्यांना कोणत्याच क्रिकेट बोर्डची साथ सध्यातरी मिळाली नाही.
काही रिपोर्टनुसार, पाकिस्तानने १५ फेब्रुवारीच्या भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी अन्य क्रिकेट बोर्डचे समर्थन मिळण्यासाठी संपर्क केला असता सर्वांनी त्यांना नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान संकटात आला आहे.
बांग्लादेशने या स्पर्धेतून माघार घेतल्याने त्यांना समर्थन दर्शवण्यासाठी पाकिस्ताने हा निर्णय घेतल्याचे कळते, मात्र त्याचा त्यांनाच त्रास होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या क्रिकेट बोर्डांनी पाकिस्तानने हा वाद मुद्दाम वाढवल्याचे म्हटले आहे. सुरू असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात भारत-पाकिस्तान समोरा-समोर आले होते, तो सामना मात्र झाला.
तसेच १५ फेब्रुवारीला पाकिस्तान महिला ए संघही भारत ए संघाविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना बॅंकॉकमध्ये खेळला जाणार आहे. रायजिंग स्टार्स एशिया कप २०२६ स्पर्धेचा हा सामना असून तो रद्द करण्याबाबत कोणतेच वृत्त समोर आलेले नाही. तसेच टी२० विश्वचषकाचा सामना श्रीलंकेत होणार असून पाकिस्तान का मनाई करत आहे, हे एक न सुटणारे कोडेच आहे.
पाकिस्तानने त्यांचा निर्णय सोशल मीडियामार्फत सांगितला. त्याच्या काही वेळानंतर पाकिस्तानने महिला ए संघ जाहीर केला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) त्यांना अधिक विचार करण्यास सांगितले आहे. सध्यातरी आयसीसीने चर्चा करण्याचे ठरवले नाही.
भारत-पाकिस्तान टी२० विश्वचषक सामना रद्द तर पाकिस्तान महिला ए-भारत महिला ए सामना होणार असल्याने या दोन्ही प्रकरणावरून परिस्थिती समजण्याच्या पलिकडे आहे, की पाकिस्तानला नेमके काय म्हणायचे आहे.





