आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र काही थांबत नाही. आता सहयजमान संघ श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मंगळवारी (१० फेब्रुवारी) झालेल्या एमआरआय स्कॅनमध्ये त्याच्या डाव्या स्नायूला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले आहे. श्रीलंका क्रिकेटने त्याच्या जागी बदली खेळाडूचे नावही जाहीर केले आहे.
हसरंगाने या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात उत्तम कामगिरी केली होती. त्याने आयर्लंडला लक्ष्याचा पाठलाग करताना अडसर निर्माण केली होती. या सामन्यात त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. यामध्येच त्याला दुखापत झाली होती, आता ती गंभीर असल्याने तो या स्पर्धेतील बाकीच्या सामन्यांत खेळणार नाही. त्याच्या जागी श्रीलंकेच्या संघात लेगस्पिन-बॉलिंग अष्टपैलू दुशन हेमंथा यांची निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत श्रीलंकेने आयर्लंडचा २० धावांनी पराभव करत विजयी सुरूवात केली होती. त्यामध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजंनी चांगली कामगिरी केली होती. त्यापैकी एक हसरंगा होता. आता तोच संघात नसल्याने २०१४च्या विजेत्या संघासाठी हा मोठा धक्का आहे.
आयसीसीने बदली खेळाडूला अद्याप मान्यता दिलेली नाही. हेमंथाच्या तुलनेत हसरंगा सरसच आहे. हेमंथाने ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा ईकॉनॉमी रेट ७.८५ असल्याने श्रीलंका संघ त्याला थेट अंतिम अकरामध्ये संधी देऊ शकतात. तसेच श्रीलंकेच्या संघात रिजर्व म्हणून एकही फिरकीपटू नाही.
हसरंगाच्या रुपात श्रीलंकेला नक्कीच मोठा झटका आहे. तो या स्पर्धेत संघासाठी उत्तम कामगिरी करणारा खेळाडू राहिला आहे. यामध्ये त्याने २० डावांमध्ये ४० विकेट्स घेतल्या आहेत. त्यावेळी त्याचा ईकॉनॉमी रेट ६.०१ असा राहिला
तसेच आधीच श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज इशान मलिंगा हा स्पर्धा सुरू होण्याआधीच संघाबाहेर झाला होता. त्याच्याजागी संघात प्रमोद मदुशनला संघात घेतले आहे. मलिंगाला इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दुखापत झाली होती. पावसानंतर सामना सुरू झाला असता त्याने गोलंदाजी केली असता त्याला खांद्याची दुखापत झाली.
या स्पर्धेत श्रीलंकेचा पुढील सामना १२ फेब्रुवारीला ओमानविरुद्ध आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि १९ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध आहे.





