आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आजचा (शनिवार ,१४ फेब्रुवारी) दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात खेळला गेला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंड ५ विकेट्सने जिंकला आहे. हा सामना जिंकणे इंग्लंडसाठी महत्वाचे होते. त्यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली.
या स्पर्धेत मागील काही सामन्यांमध्ये अनेक लहान संघांनी बलाढ्या आणि विश्वविजेत्या संघांना चांगलीच टक्कर दिली आहे. कालच्याच (शुक्रवार, १३ फेब्रुवारी) सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत धक्का दिला. नेपाळनेही इंग्लंडला विजयासाठी चांगलेच झुंजवले होते. यामुळे या सामन्यात काय निकाल लागणार याची
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
या सामन्यात स्कॉटलंडने १९.४ षटकात १० विकेट्स गमावत १५२ धावा केल्या. स्कॉटलंडच्या फलंदाजीची सुरूवात संथ झाली. त्यांनी पहिलीच विकेट १८ धावांवर गमावली. मायकल जोन्सही ३३ धावा करत बाद झाला. त्यानंतर कर्णधार रिची बेरिंग्टनने टॉम ब्रूसच्या साथीने डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र एकही मोठी भागीदारी झाली नाही. बेरिंग्टन सर्वाधिक अशा ४९ धावा करत बाद झाला. त्याने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले. ब्रूसने २४ धावा आणि ऑलिव्हर डेविडसनने २० धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त कोणीही दुहेरी धावा करू शकला नाही. इंग्लंडकडून सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामध्ये जोफ्रा आर्चर आणि आदिल रशिदची गोलंदाजी प्रभावी ठरली. आर्चरने ४ षटकात २४ धावा देत २ विकेट्स घेतल्या, तर रशिदने ४ षटकात ३६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
लक्ष्य सोपे वाटत असले तरी त्यासाठी इंग्लंडला बरेच कष्ट करावे लागले. त्यांची अडखळतच फलंदाजीला सुरूवात झाली. त्यांनी पॉवरप्लेमध्येच दोन विकेट्स गमावल्या. फिल सॉल्ट आणि जोस बटलर एकेरी धावांवरच बाद झाले. त्यानंतर मात्र जेकब बेथेल आणि टॉम बॅंटनने संघाचा विजय केला. जेकब आणि टॉमने तिसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूत ६६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडच्या जिंकण्याचा आशा टिकून राहिल्या.
जेकब ३२ धावा करत बाद झाला आणि पुन्हा एकदा सामना स्कॉटलंडच्या बाजून झुकला. टॉम मात्र एक बाजू लढवत राहिला. त्याने नाबाद ६३ धावा केल्या. सॅम करनने गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही हात आजमावला. त्याने २० चेंडूत २८ धावा केल्या. विल जॅक्स १० चेंडूत १६ धावा करत नाबाद राहिला.
स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली असली तरी २०-२५ धावा कमी पडल्या नाहीतर सामन्याचा निकाल काही वेगळाच असता. कारण लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडने ५ विकेट्स गमावल्या आणि १८.२ षटकात ते पूर्ण केले.
या विजयासह इंग्लंड ग्रुप सी मध्ये ४ गुण मिळवत दुसऱ्या स्थानी आला आहे. स्कॉटलंड दोन गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.






