---Advertisement---

T20 WC26: ऐतिहासिक क्षण! झिम्बाब्वे सुपर-8 मध्ये दाखल, ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर

On: मंगळवार, फेब्रुवारी 17, 2026 5:44 PM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मधील ३२वा सामना पावसामुळे रद्द झाला. हा सामना ग्रुप सी मधील आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे असा होता. जो आज (मंगळवार, १७ फेब्रुवारी) पल्लेकेलेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार होता. नाणेफेक न होता हा सामना रद्द झाला आहे. यामुळे दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाले. तीन सामन्यात दोन विजय आणि एक अनिर्णीत निकाल यामुळे झिम्बाब्वेचे ५ गुण झाले. यानंतर ऑस्ट्रेलिया ग्रुपस्टेजमधूनच स्पर्धेबाहेर झाला आणि झिम्बाब्वे सुपर-८मध्ये पोहोचला आहे.

२०२४ च्या टी२० विश्वचषकात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या झिम्बाब्वे संघासाठी या हंगामात सुपर-८मध्ये पोहोचणे एक स्वप्नासारखेच आहे. त्याचबरोबर ते २०२८च्या टी२० विश्वचषकासाठीही पात्र ठरतील.

या स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया १७ वर्षानंतर ग्रुप स्टेजमधून बाहेर झाला आहे. याआधी ते २००९मध्ये ग्रुप स्टेजमधून बाहेर झाले होते. २०२१च्या विजेत्या संघासाठी आयर्लंडने हा सामना जिंकणे महत्वाचे होते, मात्र सामनाच रद्द झाल्याने त्यांच्यावर स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ आली आहे. ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेत मागील दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. श्रीलंकेने त्यांना ८ विकेट्सने आणि झिम्बाब्वेने २३ धावांनी पराभूत केले होते. त्यांनी केवळ आयर्लंडविरुद्धच विजय मिळवला होता.

या स्पर्धेआधी ऑस्ट्रेलिया संघातील अनेक अनुभवी खेळाडू दुखापतग्रस्त झाले, त्याचाच हा परिणाम म्हणता येईल. त्यांचे पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेला मुकले. कालच (१६ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाने स्टिव्ह स्मिथला संघात घेतले होते. आता या स्पर्धेत त्यांचा एक सामना बाकी असून तो २० फेब्रुवारीला ओमानविरुद्ध आहे. हा सामना आता केवळ औपचारिकता म्हणून राहिला आहे.

सिकंदर रजाच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वेने या स्पर्धेच्या ग्रुपमधील पहिल्या सामन्यात ओमानला ८ विकेट्सने आणि दुसऱ्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवले. आजचा हा त्यांचा तिसरा सामना होता, जो पावसामुळे वाया गेला. चौथा सामना श्रीलंकेविरुद्ध असून तो १९ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.

सुपर -८मध्ये आता सात संघांनी त्यांची जागा पक्की केली आहे. त्यामध्ये भारत, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे सुपर-८च्या ग्रुप-१ मध्ये आहेत. दुसऱ्या सुपर-८च्या ग्रुपमध्ये श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड आहे. यातील चौथा संघ पाकिस्तान असू शकतो.

सुपर-८मध्ये झिम्बाब्वेचा पहिला सामना २३ फेब्रुवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध, दुसरा सामना २६ फेब्रुवारीला भारत विरुद्ध आणि तिसरा सामना १ मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---