भारतीय संघाने अखेरच्या क्षणी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठीच्या 15 सदस्यीय संघात बदल केला. भारताने दुखापतग्रस्त अक्षर पटेल याच्या जागी अनुभवी आणि दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला ताफ्यात सामील केले. अश्विन यावेळी आपला तिसरा विश्वचषक खेळेल. यापूर्वी तो विश्वविजेत्या 2011 आणि 2015मध्ये उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. अश्विन आणि विराट कोहली हे प्रतिष्ठित 2011 विश्वविजेत्या भारतीय संघातील असे फक्त दोन खेळाडू आहेत, जे आगामी विश्वचषकात भारतीय संघाचा भाग आहेत. अशात अश्विनने त्याच्या निवडीविषयी भाष्य केले आहे.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया संंघाविरुद्धच्या वनडे मालिकेतून भारतीय संघात (Team India) पुनरागमन केले. अश्विन जवळपास 20 महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय वनडे संघात परतला. अनुभवी फिरकीपटू अश्विनने याविषयी स्टार स्पोर्ट्सवर यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्याशी मोकळेपणाने चर्चा केली.
‘हे माझ्यासाठी आश्चर्यजनक’
दिनेश कार्तिक याच्याशी बोलताना अश्विन म्हणाला, “आयुष्य आश्चर्याने भरलेले आहे. मी प्रामाणिकपणे विचार करत नव्हतो की, मी इथे असेल. संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखवला आहे आणि परिस्थितीने निश्चित केले आहे की, मी आज इथे आहे. मात्र, मागील काही वर्षांमध्ये खेळाचा आनंद घेणे, हाच माझा मुख्य उद्देश राहिला आहे. या स्पर्धेतही मी हेच करणार आहे.”
अश्विनचा भारतीय संघाला विजयाचा मंत्र
अश्विन याने पुढे बोलताना म्हटले, “या स्पर्धेत अधिक खेळाडूंसाठी दबाव सर्वात महत्त्वाचा आहे. मात्र, तुम्ही यावर कसा तोडगा काढता, हे ठरवतं की, स्पर्धा तुमच्यासाठी आणि संघासाठी कशी असेल. माझा प्रश्न असेल, तर चांगल्या ठिकाणी राहणे आणि खेळाचा आनंद लुटणे मला चांगल्या स्थितीत ठेवेल. मी हेच म्हणत आलो आहे, हा भारतासाठी माझा अखेरचा विश्वचषक असू शकतो.”
अश्विनची वनडे कारकीर्द
अश्विन याच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 115 सामने खेळले आहेत. त्यातील 113 डावात गोलंदाजी करताना त्याने 33.2च्या सरासरीने आणि 4.95च्या इकॉनॉमी रेटने 155 विकेट्स घेतल्या आहेत. 25 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी राहिली आहे. तसेच, फलंदाजी करताना त्याने 1 अर्धशतकाच्या मदतीने 707 धावाही केल्या आहेत. (ICC odi world cup 2023 ravichandran ashwin honest reaction to team india squad inclusion)
हेही वाचा-
विश्वचषकात मॅक्सवेल करणार ऑस्ट्रेलियाची गोची! भारतीय दिग्गज म्हणाला, ‘त्याच्या बॅटमधून धावा…’
भारताविरुद्धच्या Warm-Up सामन्यापूर्वी ‘स्टेन गन’ने नेदरलँडच्या खेळाडूंना दिल्या टिप्स, व्हिडिओ व्हायरल