मुंबई । ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा आयोजित केली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या स्पर्धा होणार की नाही याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. या स्पर्धेविषयी गुरुवारी टेलि कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आयसीसीची बैठक झाली. यात अंतिम निर्णय होऊ शकला नाही. पुढील निर्णय दहा जूननंतर येणार आहे.
आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा झाल्या नाही तर भारतात आयपीएलची स्पर्धा होऊ शकते असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. ऑस्ट्रेलियात होणारी विश्वकरंडक स्पर्धा ही दोन वर्षासाठी पुढे ढकलली जाऊ शकते अशीही चर्चा होत आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाचे थैमान घातल्याने त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ही स्पर्धा होण्याची शक्यता फार कमी आहे.
कोरोनामुळे सर्वच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेले आहे. क्रिकेटपटू त्यांचा सध्याचा वेळ आपल्या परिवाराबरोबर व्यतीत करत आहेत. सर्वच स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्यामुळे आयसीसीला प्रचंड आर्थिक फटका बसत आहे.