यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सुपर 8चा पहिला सामना बुधवारी (19 जून) रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध युनायटेड स्टेट्स अमेरिका (RSA vs USA) यांच्यामध्ये खेळला गेला. सर व्हिव्हियन रिचर्ड्स या स्टेडियमवर हा सामना रंगला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 18 धावांनी शानदार विजय मिळवला.
दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 195 धावांचा पाठलाग करताना अमेरिका संघ 176 धावाच करु शकला त्यामध्ये यष्टीरक्षक अँड्रिज गॉसनं 47 चेंडूत नाबाद 80 धावांची दमदार खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं 5 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार लगावले. तर हरमीत सिंगनं 22 चेंडूत 38 धावांची खेळी केली. यादरम्यानं त्यानं 3 उत्तुंग षटकार ठोकले. परंतु संघाला विजय मिळवू देऊ शकले नाहीत.
दक्षिण आफ्रिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा यानं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर केशव महाराज, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आणि संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी अमेरिकेनं टाॅस जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं 4 गडी गमावून 194 धावा ठोकल्या. त्यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकनं 40 चेंडूत सर्वाधिक 74 धावांची आक्रमक खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं 7 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार ठोकले. कर्णधार एडन मार्करम 46, हेनरिक क्लासेन 36, ट्रिस्टन स्टब्स 20 धावा यांच्या जोरावर आफ्रिकेनं 4 गडी गमावून 194 धावा केल्या.
अमेरिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरनं आणि हरमीत सिंग यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर अमेरिकेचा अन्य कोणताही गोलंदाज विकेट घेऊ शकला नाही.
दक्षिण आफ्रिका संघ- क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम(कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी
अमेरिका संघ- शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (यष्टीरक्षक), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, अली खान, सौरभ नेत्रावळकर
महत्त्वाच्या बातम्या-
भारताची एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडी, स्मृती मानधाना, हरमनप्रीत कौरचे झंझावाती शतक
क्विंटन डी कॉकचं झंझावाती अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेनं अमेरिकेसमोर ठेवलं 195 धावांचं आव्हान
सुपर 8 सामन्यापूर्वी ‘किंग’ कोहलीच्या कमबॅकवर आकाश चोप्रानं केली भविष्यवाणी






