आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मधून ऑस्ट्रेलिया बाहेर झाला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदाच साखळी फेरीतून ऑस्ट्रेलिया बाहेर झाला आहे. याआधी ते २००९मध्ये साखळी फेरीतून बाहेर झाले होते. शुक्रवारी (२० फेब्रुवारी) खेळण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानवर चांगलाच हल्ला केलेला दिसला. ऑस्ट्रेलियाने हा सामना ९ विकेट्स आणि ६२ चेंडू शिल्लक राखत जिंकला. त्याचबरोबर त्यांनी एक विश्वविक्रमही केला.
श्रीलंकेच्या पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेलेला हा शेवटचा साखळी सामना होता. ग्रुप बी मधील आधीच दोन संघ सुपर-८मध्ये पोहोचल्याने या सामन्याचे महत्व जरा कमी झाले होते. दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर झाल्याने हा सामना म्हणजे एक औपचारिकताच होती. तसेच हा सामना ओमानसाठी अनुभव तर ऑस्ट्रेलियासाठी सन्मानाची बाब होता.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या ओमानला ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी भारी पडलेली दिसली. जेव्हा सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर वेगवान गोलंदाज जेवियर बार्टलेटने सलामीवीर आमिर कलीमला त्रिफळाचीत केले. त्यानंतर बाकी फलंदाजांनी काही वेळ डाव सांभाळला, मात्र ५९ धावसंख्येपर्यंत वरील चारही विकेट्स गेल्या. हे चारही फलंदाज बोल्ड झाले आणि टी२० विश्वचषकाच्या इतिहासात एका नवा विक्रम घडला. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच आणि पुरुषांच्या टी२० आंतरराष्ट्रीय डावात ११ वेळा अव्वल चार खेळाडू बोल्ड झाले आहेत.
ओमानच्या मधल्या फळीतील वसीम अलीने काही चांगले शॉट खेळण्याचा प्रयत्न करत संघासाठी धावा केल्या. त्यामुळे ओमानने १६.२ षटकांपर्यंत सर्व विकेट्स गमावत १०४ धावसंख्या केली . यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने ४ आणि ग्लेन मॅक्सवेल, बार्टलेटने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली. एका क्षणाला असे वाटले जसे की ते स्पर्धेतून बाहेर पडण्याचा सर्व राग ओमानवर काढत आहेत. दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकलेल्या मार्शने यावेळी २६ चेंडूतच ५० धावा पूर्ण केल्या. तो ३३ चेंडूत ६४ धावा करत नाबाद राहिला. यामध्ये त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले.
ट्रेविस हेडने काही उत्तम शॉट्स खेळले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८.१ षटकात ९३ धावांची भागीदारी केली. हेडने १९ चेंडूत ३२ धावा केल्या. त्याच्यानंतर मार्शने इंग्लिससोबत संघाला विजय मिळवून दिला.






