आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत आजचा (२२ फेब्रुवारी) पहिला सुपर-८चा सामना इंग्लंड विरुद्ध श्रीलंका असा खेळला जात आहे. कॅंडीच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. यामध्ये इंग्लंडने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी २० षटकात ९ विकेट्स गमावत १४६ धावा केल्या. यामुळे श्रीलंका सहज हे लक्ष्य पार करेल असे वाटत असताना चकीत करणारा खेळ झाला.
या स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये स्पिनर्स चांगली कामगिरी करत आहेत. याचाच प्रत्यय या सामन्यातही आला. इंग्लंडचा फिरकीपटू विल जॅक्सने उत्तम कामगिरी करत श्रीलंकेला पॉवरप्लेमध्येच धक्का देण्यास सुरूवात केली. यामध्ये त्याने ३ षटकात १४ धावा देत ३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आणि एक विक्रमही आपल्या नावे केला.
जॅक्स हा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये इंग्लंडकडून एकाच सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स घेणारा पहिलाच स्पिनर ठरला आहे. यामुळे श्रीलंकेची स्थिती ६ षटकानंतरच ५ विकेट्स ३४ धावा अशी झाली होती. त्याने या सामन्यात ४ षटकात २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या आहेत.
जॅक्स या स्पर्धेत उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने नेपाळविरुद्धच्या सामन्यात नाबाद ३९ धावा (१८ चेंडू) करताना एक विकेटही घेतली होती. स्कॉटलंडविरुद्धही १० चेंडूत नाबाद १६ धावांची खेळी केली होती. ईटलीविरुद्ध २२ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या आणि एक विकेट घेतली होती. आताही त्याने श्रीलंकेविरुद्ध अष्टपैलू खेळी केली आहे. फलंदाजी करताना २१ धावा केल्या आणि गोलंदाजीत श्रीलंकेची वरची फळी उध्वस्त केली.
श्रीलंकेचे पहिले चार फलंदाज एकेरी धावसंख्येवरच बाद झाले. जॅक्सने कुशल मेंडिस, पवन रथनायके आणि दुनीथ वेलालागे यांना बाद केले. त्याला जोफ्रा आर्चरकडूनही चांगली साथ मिळाली. आर्चरने श्रीलंकेच्या दोन्ही सलामीवीरांना (पथुम निसांका आणि कामिल मिशारा) माघारी पाठवले.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर फिलीप सॉल्टने ४० चेंडूत ६२ धावा केल्या. सॉल्ट आणि जॅक्स वगळता इंग्लंडच्या बाकी फलंदाजांनी निराशा केली. श्रीलंकेची स्थिती अधिकच गंभीर असून त्यांनी १५ षटकानंतर ८६ धावा करताना ८ विकेट्स गमावल्या आहेत.





