आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चे सर्व साखळी सामने खेळून झाले आहेत. यामुळे आजपासून (२१ फेब्रुवारी) सुपर-८च्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. यातील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड असा खेळला जाणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरूवात होणार आहे. दोन्ही संघांची या स्पर्धेच्या इतिहासातील समोरा-समोरची कामगिरी पाहिली तर तुम्हाला धक्काच बसेल.
पाकिस्तानने २००९मध्ये टी२० विश्वचषक जिंकला आहे, तर न्यूझीलंडला एकदाही या स्पर्धेचे विजेतेपद मिळाले नाही. यामुळे हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. या दोन्ही संघांमध्ये या स्पर्धेत आमने-सामने येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते टी२० विश्वचषकात भिडले आहेत.
टी२० विश्वचषकात पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध उत्तम कामगिरी केल्याची नोंद आहे. यामध्ये ५ सामने पाकिस्तानने जिंकले होते, तर न्यूझीलंडला केवळ २ सामनेच जिंकता आले आहेत. यामध्ये २००९ आणि २०२२मध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांचा देखील समावेश आहे. त्यातील काही सामन्यांच्या कामगिरी पाहू.
टी२० विश्वचषक २००७मध्ये हे दोन संघ उपांत्य फेरीत एकमेकांसमोर आले होते. केपटाऊनमध्ये झालेला तो सामना पाकिस्तानने ६ विकेट्सने जिंकला होता. तसेच २००९मध्ये हे संघ ओव्हल क्रिकेट ग्राऊंडवर समोरा-समोर आले होते. त्यामध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना केवळ ९९ धावसंख्या उभारली होती. ते लक्ष्य पाकिस्तानने ४१ चेंडू आणि ६ विकेट्स राखत जिंकले होते.
हे दोन्ही संघ शेवटचे या स्पर्धेत २०२२मध्ये एकमेंकाविरोधात खेळले होते. तेव्हाही पाकिस्ताननेच बाजी मारली होती. त्यामध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १५२ धावा केल्या होत्या. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या त्या सामन्यात पाकिस्तानने शेवटच्या षटकात ७ विकेट्सने तो सामना जिंकला होता.
तसेच या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ४९ टी२० सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानने २४ सामने जिंकले आहेत, दुसरीकडे न्यूझीलंडने २३ सामने जिंकले आहेत. तसेच दोन सामने अनिर्णीत राहिले. यावरून टी२० मध्ये दोन्ही संघांची कामगिरी तुलनेने सारखीच आहे, मात्र न्यूझीलंडला चिंता त्यांच्या टी२० विश्वचषकातील कामगिरीची असेल.
या स्पर्धेत पाकिस्तान तिनदा अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर न्यूझीलंडने एकदाच अंतिम फेरी गाठली. २०२१च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत केले होते. तसेच मागील पाच टी२० सामन्यांची कामगिरी पाहिली तर न्यूझीलंडने ४ सामने जिंकले असून पाकिस्तान केवळ एकच सामना जिंकू शकला. त्यावेळी पाकिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता.
या स्पर्धेत पाकिस्तानचा साहिबजादा फरहान चांगलाच फॉर्ममध्ये आहे. तो सध्या सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने ४ सामन्यात २२० धावा केल्या आहेत. त्याला रोकण्याचे प्रयत्न किवी गोलंदाजांसमोर असणार आहेत.






