पुरूष क्रिकेट संघ भारत आणि श्रीलंकेत आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत खेळण्यात व्यस्त आहे. यामध्ये पाकिस्तानने कसाबसा त्यांचा पहिला सामना जिंकत दोन अंक मिळवले आहेत. त्यांनी ७ फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात नेदरलॅंड्सचा ३ विकेट्सने पराभूत केले. त्यामध्ये संघात जागा न मिळालेले काही पाकिस्तानी खेळाडूंच्या पंतग उडवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रऊफ आणि हसन अली पंतग उडविताना दिसत आहेत. या दोघांनाही पाकिस्तान क्रिकेट बोर्डने सुरू असलेल्या टी२० विश्वचषकासाठी दुर्लक्षित केले आहे. या व्हिडिओनंतर रऊफ चांगलाच ट्रोल होत आहे. रउफच्या या व्हिडिओवर काहींनी मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. ‘काहींनी त्याला पंतगाचा वर्ल्डकप खेळवा’, असे म्हटले आहे.
पाकिस्ताने टी२० विश्वचषकासाठी १५ सदस्य असलेला संघ घोषित केला. त्यामध्ये बाबर आझमला घेतले, मात्र रऊफबरोबर विकेटकीपर-फलंदाज मोहम्मद रिझवान यालाही वगळले.
रउफला का नाही घेतले, याबाबत पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसनने खुलासा केला. त्यांच्या मते, संघात निवडलेल्या वेगवान गोलंदाजांमध्ये अष्टपैलूत्व कामगिरी करण्याची प्रतिभा आहे, यामुळे रऊफला घेतले नाही.
“आम्ही रऊफ, वसिम ज्युनियर आणि अहमद दानियाल यांचा विचार केला होता, मात्र शाहीन, सलमान आणि नसीम हे तिघे तीन भागांमध्ये गोलंदाजी करण्यात सज्ज आहेत”, असेही हेसन यांनी स्पष्टीकरण दिले.
पाकिस्तान या स्पर्धेत सलमान आगाच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. त्यांचा पुढील सामना १० फेब्रुवारीला यूएसएविरुद्ध आहे. हा सामना कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाणार असून पाकिस्तानला या सामन्यासाठी चांगलीच तयारी करावी लागणार आहे. कारण मागील टी२० विश्वचषकात त्यांना अमेरिकेने पराभूत केले होते.
तसेच यूएसने या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात यजमान भारताच्या फलंदाजांची वरची फळी जवळपास उध्वस्त केली होती.






