प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या रेडियोवरील कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ बाबत वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय वंशाच्या खेळाडूंचे कौतुक केले आहे. ते जेथेही जातात तेथे आपले योगदान देतात, असे मोदींना खेळांडूबाबत म्हटले आहे.
मोदींनी म्हटले, “मी नेहमी म्हणतो जो खेळतो तो नेहमी प्रगती करतो. खेळ आपल्याला एकत्र आणतो. सध्या तुम्ही टी२० विश्वचषक पाहत आहात आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुमचे लक्ष एखाद्या खास खेळाडूवर असते.
जर्सी कोणत्या तरी वेगळ्याच देशाची असते आणि जेव्हा आपण त्याचे नाव ऐकतो तेव्हा तो आपल्या देशाचा वाटतो. ते पाहून आनंद होतो.”
भारतीय वंशाचे हे खेळाडू त्या देशाचे प्रतिनिधित्व करतात ज्या देशात त्यांचे कुटुंब असते. आपापल्या देशाची जर्सी घालून ते मैदानात उतरतात आणि संघाचे प्रतिनिधित्व करतात.
यावेळी मोदींनी कॅनडा संघात भारतीय वंशाच्या खेळाडूंची संख्या अधिक असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी कॅनडाचा कर्णधार दिलप्रीत बाजवा याचा जन्म पंजाबच्या गुरदासपूरमध्ये झाल्याचाही उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, “अमेरिकेच्या संघातही अधिक भारतीय वंशाचे खेळाडू अधिक आहेत. ते दुसऱ्या देशात क्रिकेटचा प्रसार होण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, ते पाहून गर्व वाटतो.”
कॅनडा संघात सर्वाधिक असे ११ भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. त्यानंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो त्यामध्ये ९ खेळाडू आहेत. ओमान आणि यूएईमध्येही प्रत्येकी ७-७ भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. न्यूझीलंडमध्ये २ खेळाडू भारतीय वंशाचे असून दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, नेदरलॅंड्स आणि ईटलीमध्ये प्रत्येकी एक-एक खेळाडू आहेत.





