आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत, दक्षिण आफ्रिकानंतर आता वेस्ट इंडिजनेही त्यांचे सर्व साखळी सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजने आज (गुरूवार, १९ फेब्रुवारी) ईटलीचा ४२ धावांनी पराभव केला. यामध्ये वेस्ट इंडिजने १६६ धावांचे लक्ष्य दिले असता ईटलीने १८ षटकात सर्व विकेट्स गमावत १२३ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून शामर जोसेफची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
जोसेफने त्याच्या ४ षटकात ३० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याने ईटलीचा कर्णधार हॅरी मॅनेंटी, ग्रांट स्टेवार्ट, थॉमस ड्राका आणि अली हसन यांच्या विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सईद नक्वी, जेजे स्मट्स, जियान मीडे आणि ऍंथोनी मोस्का यांच्या कॅच पकडल्या. त्यामुळे त्याने एकाच टी२० सामन्यात चार विकेट्स घेत चार झेल पकडत इतिहास रचला आहे.
आंतरराष्ट्रीय महिला किंवा पुरुष संघांच्या टी२० सामन्यात चार विकेट्स घेत चार झेल पकडणारा जोसेफ पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसेच तो टी२० विश्वचषकात नॉन-विकेटकीपरने एका सामन्यात सर्वाधिक झेल पकण्याच्या यादीतही संयुक्तपणे सामील आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी कामगिरी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने केली होती. त्याने २०१०मध्ये ऑयर्लंडविरुद्ध चार झेल पकडले होते.
ईटलीविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होपने ४६ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याने केलेल्या या खेळीमुळे वेस्ट इंडिजने समाधानकारक धावसंख्या उभारली, कारण त्यांचे रोस्टन चेज आणि शेरफन रुदरफोर्ड हे खेळाडू वगळता बाकी फलंदाज लवकरच बाद झाले. दोघांनीही प्रत्येकी २४- २४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ईटलीकडून सर्वोच्च खेळी बेन मॅनेंटीची ठरली त्याने २१ चेंडूत २६ धावा केल्या.
जोसेफच्या कामगिरीमुळे ईटलीला पराभवाचा सामना करावा लागला. शायने प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. वेस्ट इंडिज आधीच सुपर-८मध्ये पोहोचला आहे. तसेच ईटलीचा हा पहिलाच टी२० विश्वचषक होता. त्यांनी ४ पैकी एक सामना जिंकला.
टी20 विश्वचषकात सर्वाधिक झेल (विकेटकीपर नसलेले)
4 – डॅरेन सॅमी (वेस्ट इंडिज) वि. आयर्लंड, प्रोव्हिडन्स, 2010
4 – एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका) वि. बांग्लादेश, न्यू यॉर्क, 2024
4 – ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) वि. नामिबिया, नॉर्थ साउंड, 2024
4 – जॉर्ज मुन्से (स्कॉटलंड) वि. ईटली, कोलकाता, 2026
4 – शमर जोसेफ (विंडीज) वि. ईटली, कोलकाता, 2026





