उद्या रांची येथे ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. वनडे मालिकेत निराशाजनक कामगिरीनंतर ऑस्ट्रेलिया आता टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलिया आणि भारताला टी-२० क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी आहे.
संघाच्या चांगल्या कामगिरी बरोबर भारताचा कर्णधार विराट कोहली आपले आयसीसी क्रमवारीतील पहिले स्थान टिकवण्याचा प्रयत्न करेल. तर जसप्रीत बुमराही गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी येण्याचा प्रयत्न करेल.
पाकिस्तानचा इमाद वासिम हा गोलंदाजनच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे तर दुसऱ्या स्थानावर जसप्रीत बुमरा आहे, जो की वासिमपेक्षा पाच गुणांनी मागे आहे. त्यानंतर गोलंदाजांच्या यादीत जेम्स फॉकनर ७ व्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा ऍरोन फिंच हा विराटनंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या क्रमांकावर धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आहे. दोनीही संघातून हे तीनच खेळाडू या यादीत पहिल्या १०मध्ये आहेत.
भारत सध्या ५व्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया ७व्या क्रमांकावर आहे. भारताला या मालिकेनंतर आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर येण्याची संधी आहे तर ऑस्ट्रेलिया जास्तीत जास्त तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकते.
पाहुयात काय होऊ शकतात क्रमवारीत बदल !
१. भारत ३ ऑस्ट्रेलिया ० – भारत २ऱ्या क्रमांकावर झेप घेईल तर ऑस्ट्रेलिया ७व्या स्थानावरच राहील.
२. भारत २ ऑस्ट्रेलिया १ – भारत ५व्या क्रमांकावरच राहील तर ऑस्ट्रेलिया ७व्या स्थानावरच राहील.
३. भारत १ ऑस्ट्रेलिया २- भारत ६व्या स्थानावर घसरेल तर ऑस्ट्रेलिया ५व्या स्थानी झेप घेईल.
४. भारत ० ऑस्ट्रेलिया ३ – भारत ७व्या स्थानावर घसरेल तर ऑस्ट्रेलिया ३ऱ्या स्थानावर झेप घेईल.