धरमशाला कसोटीत भारतीय संघानं इंग्लंडचा अवघ्या तीन दिवसांत धुव्वा उडवला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाला एक डाव आणि ६४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयानंतर टीम इंडिया आयसीसी रॅकिंगमध्ये कसोटी, वनडे आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानावर आली आहे.
कसोटीमध्ये भारत 122 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत टीम इंडिया 121 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर टी-20 फॉरमॅटमध्ये भारत 266 रेटिंग पॉइंट्ससह नंबर-1 संघ आहे. भारत-इंग्लंड धरमशाला कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. मात्र आता टीम इंडियानं कांगारूंना मागं टाकलं आहे. ऑस्ट्रेलिया 117 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर 111 रेटिंग गुणांसह न्यूझीलंडचा क्रमांक लागतो.
यासह ICC कसोटी क्रमवारीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा दबदबा कायम आहे. बुमराह 867 रेटिंग गुणांसह कसोटीत अव्वल स्थानावर आहे. तर रवी अश्विन 846 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन नंबर 1 फलंदाज आहे. विल्यमसनचे 870 रेटिंग गुण आहेत. यानंतर इंग्लंडचा जो रूट 799 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 789 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, कसोटीत विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल हे टॉप-10 मध्ये आहेत. विराट कोहली 744 रेटिंग गुणांसह आठव्या, तर यशस्वी जयस्वाल 727 रेटिंग गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा 720 रेटिंग गुणांसह 11 व्या क्रमांकावर आहे.
एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे 824 रेटिंग गुण आहेत. त्यानंतर शुबमन गिल (801 गुण), विराट कोहली (768 गुण) आणि रोहित शर्मा (746 गुण) यांचा क्रमांक लागतो. टी 20 क्रमवारीत भारताच्या सूर्यकुमार यादवचं अव्वल स्थान कायम आहे. तर अव्वल 10 मध्ये केवळ यशस्वी जयस्वाल (6वं स्थान) दुसरा भारतीय आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL मध्ये लांब केसांचा लूक घेऊन परततोय ‘थाला’! नेटमध्ये सरावाला सुरुवात; CSK ने शेअर केला व्हिडिओ
टीम इंडियाचं ‘न्यू ब्रॅन्ड ऑफ क्रिकेट’, ‘या’ 6 खेळाडूंनी काढली ‘बॅझबॉल’ची हवा!