आयसीसी कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटचा दबदबा वाढत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतकं झळकावणाऱ्या रुटचे आता 922 रेटिंग पॉईंट्स झाले. आता त्याला त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम रेटिंगचा विक्रम मोडण्याची संधी आहे. रुटनं गेल्या वर्षी एजबॅस्टन येथे भारताविरुद्ध शतक झळकावल्यानंतर सर्वोत्तम 923 रेटिंग गुण कमावले होते.
कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत रुट दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या केन विल्यमसनपेक्षा 63 गुणांनी पुढे आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम सलग दुसऱ्या सामन्यात मोठी धावसंख्या करू शकला नाही. यामुळे त्याची रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. बाबर 2019 नंतर प्रथमच टॉप10 मधून बाहेर पडला. 29 वर्षीय बाबर आझम आता 712 गुणांसह तीन स्थानांनी घसरून 12व्या स्थानावर आला आहे. तर मोहम्मद रिझवान आता 10व्या क्रमांकावर पाकिस्तानचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज आहे.
जो रुटनं श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं. तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग गुणांपासून फक्त एक गुण दूर आहे. याशिवाय रुटला डॉन ब्रॅडमनच्या सर्वकालीन 961 रेटिंग गुणांच्या पुढे जाण्याचीही संधी आहे. इंग्लंडच्या या अनुभवी फलंदाजाला श्रीलंकेविरुद्ध आणखी एक आणि पाकिस्तानविरुद्ध तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. रुट सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता तो ब्रॅडमनचा हा रेकॉर्ड मोडू शकतो.
आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचे 3 फलंदाज टॉप-10 मध्ये आहेत. कर्णधार रोहित शर्मा 751 रेटिंग गुणांसह सहाव्या, युवा यशस्वी जयस्वाल सातव्या तर दिग्गज विराट कोहली आठव्या स्थानावर आहे.
हेही वाचा –
घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने गमावणारे 5 संघ, कोणाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद?
‘कामगिरी दाखवा संघात स्थान मिळवा’, बांग्लादेशविरुद्ध संधी मिळणे सोपे नाही
‘बाबर आझम हट्टी, निवड समितीचे ऐकत…’, पाकिस्तानच्या माजी निवडकर्त्याचा गंभीर आरोप!