इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या कसोटी मालिका सुर असून चार सामने झाले आहे. चौथ्या सामन्यात सोमवारी (६ सप्टेंबर) भारताने १५७ धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर ५ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (८ सप्टेंबर) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूरला फायदा झाला आहे.
रोहित-विराट यांच्यातील गुणांचा फरक वाढला
ताज्या क्रमवारीनुसार पहिल्या १० क्रमांकाच्या फलंदाजांच्या स्थानांमध्ये काही बदल झालेला नाही. मात्र, गुणांमध्ये बदल झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्याच चालू कसोटी मालिकेदरम्यान रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीला कसोटी क्रमवारीत मागे टाकत ५ वा क्रमांक मिळवला होता. आता चौथ्या कसोटीनंतर त्याला क्रमवारीत पहिल्यांदाच ८०० पेक्षा अधिक गुण मिळवता आले आहे. त्याला चौथ्या कसोटीत १२७ धावांची शतकी खेळी केल्यामुळे ४० गुणांचा फायदा झाला आहे.
तसेच विराटला १७ गुणांचा फायदा झाला आहे. मात्र, रोहित आणि विराट यांच्यातील गुणांचा फरक वाढला आहे. रोहितचे आता एकूण ८१३ गुण झाले असून तो ५ व्या क्रमांकावर आहे. तर, विराट ७८३ गुणांसह ६ व्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार जो रुट(९०३) आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर केन विलियम्सन (९०१), तिसऱ्या क्रमांकावर स्टिव्ह स्मिथ (८९१) आणि चौथ्या क्रमांकावर मार्नस लॅब्यूशेन (८७८) आहेत.
बुमराहला झाला फायदा
जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत ४ विकेट्स घेतले होते. त्यामुळे त्याला गोलंदाजी कसोटी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता ७७१ गुणांसह दहाव्या स्थानावरुन नवव्या स्थानी आला आहे. गोलंदाजी क्रमवारीत बुमराह व्यतिरिक्त आर अश्विनही पहिल्या १० जणांमध्ये आहे. अश्विन ८३१ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला मात्र नुकसान झाले आहे. तो पाचव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर घसरला आहे. या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा टीम साऊथी आहे.
शार्दुलचीही क्रमवारीत प्रगती
इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत शार्दुल ठाकूरने अष्टपैलू कामगिरीने छाप पाडली होती. त्याने दोन्ही डावात अर्धशतके केली होती. तसेच ३ विकेट्सही घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला फायदा झाला असून तो आता अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीत २० व्या क्रमांकावर पोहचला आहे.
याशिवाय इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्सलाही मोठा फायदा झाला असून त्याने पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने भारताविरुद्ध चौथ्या कसोटीत एक अर्धशतक केले होते. तसेच ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता तो नवव्या क्रमांकावर आला आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या १० जणांमध्ये भारताचे रविंद्र जडेजा आणि आर अश्विन आहेत. जडेजा तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर अश्विन पाचव्या क्रमांकावर आहे.
↗️ Woakes enters top 10 in all-rounders list
↗️ Bumrah moves up one spot in bowlers rankingsThe latest @MRFWorldwide ICC Men's Test Player Rankings 👉 https://t.co/xgdjcxK2Tq pic.twitter.com/yOyxsdXLp4
— ICC (@ICC) September 8, 2021
आता इंग्लंड विरुद्ध भारत संघातील अखेरचा सामना मँचेस्टर येथे १० सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ओव्हलवरील ऐतिहासिक विजयानंतरही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ २ बदलांंची आवश्यकता
‘गोल्डन बॉय’चा भाव वाढला! ब्रँड व्हॅल्यूमध्ये नीरजने रोहित-राहुलला सोडले मागे, आता कोहलीवर नजर
ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसाठी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर यांची मेजवानी, स्वत: बनवणार जेवण