आयसीसीने बुधवारी (९ फेब्रुवारी) जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) सुधारणा केल्याचे दिसत आहे. रोहित आणि विराट कोहली (virat kohli) यांच्यातील अंतर आता कमी झाले आहे. भारतीय संघ (team india) सध्या वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेत रोहितकडे विराटला क्रमवारीत मागे टाकण्याची संधी आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमावारीत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम एकदिवसीय फलंदाजांच्या या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहेत. रोहित आणि विराटच्या क्रमवारीत बदल झाला नाहीय, परंतु दोघांच्या गुणांमधील अंतर मात्र आता कमी झाले आहे. विराट कोहली सध्या ८२८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर, तर रोहित सध्या ८०७ गुणांसर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमकडे ८७५ गुण आहेत आणि त्याने पहिला क्रमांक मजबूतीने पकडलेला आहे.
त्याव्यतिरिक्त इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुट आणि पाकिस्तानचा फखर जमा यांच्या एकदिवसीय क्रमवारीतही सुधारणा पाहायला मिळाली आहे. या दोघांनी पहिल्या १० फलंदाजांमध्ये स्वतःचे स्थान बनवले आहे. पहिल्या १० फलंदाजांमध्ये याव्यतिरिक्त दुसरा कोणताच बदल झाल्याचे दिसत नाही. पहिल्या १० मधील भारतीय फलंदाजांचा विचार केला, तर यामध्ये केवळ विराट आणि रोहित या दोघांचीच नावे आहेत.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा परिणाम क्रमवारीवर झाला आहे. रोहित शर्माने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६० धावांची महत्वाची खेळी केली होती. त्यानंतर त्याच्या गुणांमध्ये सुधारणा झाली. तसेच वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार जेसन होल्डरलाही याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. होल्डने भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती, त्यानंतर आता तो चार स्थानांच्या फायद्यासह पहिल्या २० अष्टपैलूंमध्ये पोहोचला आहे.