---Advertisement---

महिला टी२० क्रमवारी: शेफालीला मागे टाकत ‘ही’ फलंदाज अव्वल क्रमांकावर विराजमान

On: मंगळवार, मार्च 10, 2020 1:03 PM
---Advertisement---

रविवारी (8 मार्च) मेलबर्न येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women’s Vs Australia Women’s) आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील अंतिम सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी जिंकला आणि विश्वविजेतेपद मिळवले.

या सामन्यानंतर आयसीसीने सोमवारी(9 मार्च) महिला टी20 क्रमवारी (ICC Women’s T20I Ranking) जाहीर केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत टी20 विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेली ऑस्ट्रलियाची फलंदाज बेथ मूनीने (762 गुण) 2 स्थानांची प्रगती करत अव्वल क्रमांक पटकावला आहे. हा अव्वल क्रमांक पटकावताना तिने भारताची युवा फलंदाज शेफाली वर्माला मागे टाकले आहे.

महिला टी20 विश्वषकातील साखळी फेरीनंतर जाहीर करण्यात आलेल्या महिला टी20 क्रमवारीत शेफालीने 19 स्थानांची गरूड झेप घेत अव्वल क्रमांक पटकावला होता. मात्र  अंतिम सामन्यात तिला जास्त धावा न करता आल्याने, मूनीने तिची जागा घेतली आहे.

शेफालीची सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत 2 स्थानांनी घसरण झाली आहे. ती आता तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. तर दुसऱ्या क्रमांक न्यूझीलंडची कर्णधार सूझी बेट्सने पटकावला आहे. तर, न्यूझीलंडची फलंदाज सोफी डिवाइन चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

याबरोबरच अंतिम सामन्यात वेगवान अर्धशतक करणारी ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हेली 2 स्थानांची प्रगती करत 5व्या क्रमांकावर पोहोचली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग आणि भारताची अनुभवी फलंदाज स्म्रीती मंधना या प्रत्येकी एका स्थानाने घसरत अनुक्रमे 6व्या आणि 7व्या क्रमांकावर पोहोचल्या आहेत.

गोलंदाजांच्या क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाची गोलंदाज जेस जोनासन एका स्थानाची प्रगती करत 5व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिने भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात 4 षटकात 3 विकेट्स घेतल्या होत्या. तर, भारताची फिरकीपटू गोलंदाज दिप्ती शर्मा एका स्थानाने घसरत 6व्या क्रमांकावर आली आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडची फिरकीपटू सोफी इक्लेस्टोन अव्वल क्रमांकावर कायम आहे. तर, भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक 4 विकेट्स घेणारी मेगन शटही दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तसेच दक्षिण आफ्रिकाची वेगवान गोलंदाज शबनीम ईस्माइल तिसऱ्या आणि न्यूझीलंडची गोलंदाज एमिलिया केर चौथ्या क्रमांकावर आहे.

आयसीसी महिला टी20 विश्वचषकात (ICC Women’s T20 World Cup) 5व्यांदा विश्वविजेता ठरणारा ऑस्ट्रेलिया संघ 291 गुणांसह अव्वल क्रमांकावर कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावर इग्लंड (278) आणि तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड (271) हे संघ आहेत. तर, भारतीय संघ 266 गुणांसह चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---