लंडन। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात २ जूनपासून ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्स ग्राऊंडवर पार पडला असून यात यजमान इंग्लंडने ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यानंतर कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३ च्या गुणतालिकेत इंग्लंडला फायदा झाला आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातील कसोटी मालिका (Test Series) ही जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship 2021-2023) स्पर्धेचा भाग आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. सध्या हे दोन्ही संघ गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर आहेत. असे असले तरी इंग्लंडला लॉर्ड्स कसोटीतील (Lords Test) विजयामुळे फायदा झाला आहे. आता त्यांचे १३ कसोटी सामन्यांनंतर ३० गुण झाले असून १९.२३ विजयाची टक्केवारी आहे. तसेच यापूर्वीच त्यांना १० गुणांची पेनल्टी लागलेली आहे. ते सध्या गुणतालिकेत ८ व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याखाली केवळ बांगलादेश आहे.
तसेच गतविजेते न्यूझीलंड या गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर आहेत. त्यांचे ७ सामन्यांनंतर २८ गुण असून विजयाची टक्केवारी ३३.३३ आहे. या गुणतालिकेत सध्या अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे, त्यांची विजयाची टक्केवारी इतर संघांपेक्षा अधिक आहे. त्यांची विजयाची टक्केवारी ७५ आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेची टक्केवारी ७१.४३ आहे. भारतीय संघ या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची विजयाची टक्केवारी ५८.३३ अशी आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३ चा अंतिम सामना २०२३ मध्ये लॉर्ड्सवरच होण्याची शक्यता आहे. हे स्पर्धेचे दुसरे पर्व आहे. पहिल्या पर्वात न्यूझीलंडने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली होती.
इंग्लंडचा लॉर्ड्स कसोटीत विजय
लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १३२ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडलाही पहिल्या डावात फार काही खास करता आले नाही. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद १४१ धावाच केल्या. दुसऱ्या डावात मात्र न्यूझीलंडने आपली फलंदाजी सुधारली. त्यांच्याकडून डॅरिएल मिशेलने शतकी खेळी करताना १०८ धावा केल्या. तसेच टॉम ब्लंडेलने ९६ धावांची खेळी केली.
त्यामुळे न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ९१.३ षटकात सर्वबाद २८५ धावा केल्या आणि इंग्लंडला २७७ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून माजी कर्णधार जो रूटने नाबाद ११५ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडने ५ बाद २७९ धावा करत सामना आपल्या नावे केला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
विराट मोडणार सचिनच्या १०० शतकांचा विक्रम?, पाहा काय म्हणतायेत रोहितचे प्रशिक्षक
‘तो वर्ल्डक्लास खेळाडू’, पराभवानंतरही विलियम्सनने गायले प्रतिस्पर्धी खेळाडूचे गोडवे
क्रिकेटसाठी भारत सोडून पाकिस्तानात वसलेले शिलेदार, नवव्या क्रमांकावर झुंजार शतकाची आहे नोंद