भारतीय क्रिकेट संघानं अलीकडेच श्रीलंकेचा दौरा केला, जिथे टीम इंडियानं 3 एकदिवसीय आणि 3 टी20 सामने खेळले. टी20 मालिकेत भारतानं श्रीलंकेचा 3-0 असा व्हाईटवॉश केला होता. मात्र त्यानंतर श्रीलंकेनं वनडे मालिका 2-0 ने जिंकली. श्रीलंका दौरा संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना 43 दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. विश्रांतीनंतर आता भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारतीय संघाला 19 सप्टेंबरपासून पुढील 111 दिवसांत (3 महिने 19 दिवस) 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. बांगलादेशनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध तीन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. हे 10 कसोटी सामने भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचायचं असेल तर यामध्ये चमकदार कामगिरी करावी लागेल. WTC गुणतालिकेत भारत सध्या 68.52 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत भारताचे 9 सामन्यांत सहा विजय, दोन पराभव आणि एक अनिर्णित सह 74 गुण आहेत.
WTC टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. कांगारू संघाचे 12 सामन्यांत 8 विजय, 3 पराभव आणि एक अनिर्णित सह 90 गुण आहेत. त्यांच्या गुणांची टक्केवारी 62.50 आहे. डब्ल्यूटीसी टेबलमध्ये न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे 6 सामन्यांत तीन विजय आणि तीन पराभवांसह 36 गुण आहेत. किवी संघाची गुणांची टक्केवारी 50.00 आहे. यानंतर श्रीलंका चौथ्या, दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंड सातव्या, बांगलादेश आठव्या आणि वेस्ट इंडिज नवव्या क्रमांकावर आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं हे तिसरं सायकल आहे. हे 2023 ला सुरू झालं जे 2025 पर्यंत चालेल. आयसीसीनं तिसऱ्या सायकलसाठी पॉइंट सिस्टमशी संबंधित नियम आधीच जारी केले आहेत. कसोटी सामना जिंकल्यास संघाला 12 गुण, सामना अनिर्णित राहिल्यास 4 गुण आणि सामना बरोबरीत सुटल्यास 6 गुण मिळतील.
रँकिंग प्रामुख्याने पॉइंट टेबलमधील विजयाच्या टक्केवारीच्या आधारे ठरवली जाते. सामना जिंकल्यानंतर 100 टक्के गुण जोडले जातील, टाय झाल्यावर 50 टक्के, ड्रॉ झाल्यावर 33.33 टक्के आणि पराभवानंतर शून्य टक्के गुण जोडले जातील. दोन सामन्यांच्या मालिकेत एकूण 24 गुण मिळतील आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 60 गुण मिळतील.
हेही वाचा –
बाप तसा लेक! राहुल द्रविडच्या मुलाचा फलंदाजीत कहर; जोरदार षटकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल
16 वर्षांच्या चमकदार कारकिर्दीतील विराट कोहलीचे 5 मोठे विक्रम, अनेक दिग्गजांना सोडलं मागे
भारतीय खेळाडूमध्ये दिसला धोनीचा अवतार! अखेरच्या ओव्हरमध्ये षटकार ठोकून बनवलं टीमला चॅम्पियन