टीम इंडियानं शनिवारी (9 मार्च) इंग्लंडविरुद्धची पाचवी कसोटी एक डाव आणि ६४ धावांनी जिंकली. धरमशालाच्या मैदानावर भारतानं इंग्लंडचा अवघ्या तीन दिवसांतच धुव्वा उडवला. या मॅचनंतर आता ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 च्या गुणतालिकेत भारताची काय स्थिती आहे हे जाणून घेऊया.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. आजच्या विजयानंतर भारताचे गुण वाढून 68.51 टक्के झाले. यापूर्वी भारताचे 64.58 टक्के गुण होते.
चालू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चक्रात भारतानं आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियानं यापैकी 6 सामने जिंकलेत. भारताचा दोन सामन्यात पराभव झाला तर एक सामना अनिर्णित राहिला. भारतानं नुकतीच इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 अशी जिंकली. याचा फायदा भारतीय संघाला झाला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड 60.00 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पराभव पत्कारावा लागला होता, ज्यानंतर भारत अव्वल स्थानावर पोहोचला. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या (59.09 टक्के), बांगलादेश चौथ्या (50.00 टक्के) आणि पाकिस्तान पाचव्या (36.66) स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडची स्थिती अत्यंत खराब आहे. संघ 17.5 टक्के गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
धरमशाला कसोटीबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडच्या 218 धावांना प्रत्युत्तर देताना भारतानं पहिल्या डावात 477 धावांची मोठी मजल मारली. अशाप्रकारे भारताला 259 धावांची भक्कम आघाडी मिळाली. टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या माऱ्यापुढे इंग्लंडचा दुसरा डाव 195 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक (94) धावा केल्या. तर जॉनी बेअरस्टोच्या बॅटमधून 39 धावा निघाल्या.
अश्विननं आपल्या 100व्या कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केली. तो भारतासाठी कसोटीच्या एका डावात सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्यानं 36व्यांदा ही कामगिरी केली. या बाबतीत अश्विननं दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेला (३५ बळी) मागे टाकलं आहे.
इतर बातम्या-
ऐतिहासिक! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ‘हा’ 147 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त
शेरास सव्वाशेर! इंग्लंडच्या ‘बेझबॉल’ला यशस्वीच्या ‘जॅसबॉल’ने उत्तर
विराट-युवराजला संपूर्ण कारकिर्दीत जितके षटकार मारता आले नाहीत, तितके यशस्वीनं केवळ 9 कसोटीत मारले!