मेलबॉर्न । ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ६वे स्थान पटकावले आहे. त्याने विंडीजच्या ब्रायन लारा आणि शिवनारायण चंद्रपॉलचा विक्रम मोडला आहे.
कूकने १५१ कसोटी सामन्यात ११९५६ धावा केल्या आहेत तर लाराने १३१ कसोटी सामन्यात ११९५३ धावा केल्या होत्या. विंडीजच्याच शिवनारायण चंद्रपॉलने १६४ सामन्यात ११८६७ धावा केल्या आहेत.
हे करताना कूकने एक खास विक्रम केला आहे. त्याने आज नाबाद २४४ धावांची खेळी केली आहे. त्याचमुळे आज दिवसाखेर इंग्लडची ९ बाद ४९१ अशी चांगली स्थिती आहे. परंतु उद्या जर १०व्या विकेटसाठी कूकबरोबर फलंदाजी करणारा जेम्स अँडरसन बाद झाला तर कूकच्या नावावर एक खास विक्रम होणार आहे.
कसोटीत संपूर्ण डावात फलंदाजी (Carrying the bat) करून सर्वाधिक धावा(२४४) करणारा खेळाडू बनण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. त्याने या सामन्यात सर्व विकेट्ससाठी भागीदारी केली आहे.
यापूर्वी संपूर्ण डावात फलंदाजी(Carrying the bat) करत सर्वाधिक धावा करायचा विक्रम ग्लेन टर्नर यांच्या नावावर होता. त्यांनी १९७२ साली विंडीज विरुद्ध २२३ धावा करताना दुसऱ्या बाजूने प्रत्येक फलंदाजाला बाद होताना पाहिले होते.
Carrying the bat म्हणजे सलामीला येऊन संपूर्ण डावात फलंदाजी करणे आणि दुसऱ्या बाजूच्या सर्व विकेट्स गेल्या तरी नाबाद राहणे.